Tuesday, 30 August 2022

लोकराज्य


 लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित

            मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाचा ऑगस्ट-2022 या महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या अंकात महाराष्ट्राने केलेल्या आजवरच्या वाटचालीचा समग्र आढावा घेण्यात आला आहे.

            स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय आहे. राज्यातील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले. या सर्वांचा “स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्र” आणि “स्वातंत्र्यलढा आणि महिला” या लेखातून आढावा घेण्यात आला आहे. नुकताच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणाचा संपादित भाग समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात आले, या अभियानाविषयी माहिती देण्यात आली आहे. 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांचा संक्षिप्त परिचय या अंकात देण्यात आला आहे.


             कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. या विषयावर आधारित ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ हा लेख अंकात घेण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. वाचकांच्या सूचना, लेखांवरील अभिप्राय lokrajya2011@gmail.com या ई मेलवर पाठविण्यात यावे.


0000

शुभेच्छा

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा.

            मुंबई, दि. 30 : भारतीय परंपरेत अग्रपूजेचे स्थान असलेल्या बुद्धीदेवता श्रीगणेशाच्या उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करतानाच पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ब्रिटीश राजवटीत समाजमन जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आणि विदेशातही गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देश-विदेशात पोहोचली, ही अभिमानाची बाब आहे. सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना आपले सामाजिक दायित्वाचे पालन करण्याची परंपराही जोपासावी, गणरायाच्या आगमनाने वातावरणात उत्सव आणि आनंदाला भरते येत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजीही सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विशेष सूचना निवडणूक ओळखपत्र

 मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करावे

जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 29 : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून राज्यभर सुरू झाली आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत गरुडा ॲपवरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड संलग्न करता येईल. याकामी राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल असिस्टंट नियुक्त करून ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करायला मदत करावीअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले.

            मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरेतहसिलदार अर्चना मुळेतहसीलदार प्रशांत सावंतनायब तहसिलदार ज्योती खामकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. 6 ब हा फार्म भरायचा आहे. यासाठी फार्म क्रमांक 6 ब सोबत आधार कार्डची  छायांकित प्रत जोडून ती बीएलओ कडे देता येईल किंवा एनव्हीएसपी आणि व्होटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक मतदार कार्डाशी सलग्न करता येईलअसे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.

            ज्याचे वय वर्षे 18 पूर्ण झाले त्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 भरावा लागेल. यासाठी  महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूण तरूणींनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीसहकारी गृहनिर्माण संस्थांनी देखील या कामी सहकार्य करावेअसे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थलांतरित मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी 6 ए हा फॉर्म भरावा लागेल. मतदार यादीतून नाव वगळणे किंवा त्यावर आक्षेप घेण्यासाठी अर्ज क्रमांक 7 भरावा लागणार आहे. हे अर्ज National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असून मतदारांनी या सुविधेचा उपयोग करावाअसेही श्री. निवतकर यांनी सांगितले.

            नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावीयासाठी आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून 4 वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टल आणि बीएलओ यांच्या सहकार्याने ही नोंदणी येईल. युआयडीने देखील आधार कार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याची मोहीम आता सुरू केली असल्याने त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा आणि मतदार यादीतील नाव अद्यावत आधार कार्डला संलग्न करावे असे श्री. निवतकर यांनी सांगितले.

            दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. याअंतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2022 ते 24 ऑक्टोबर 2022 पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणदुबार नोंदणीतांत्रिक त्रुटी दूर करणेछायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे आदी बाबी करण्यात येईल. दिनांक 25 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नमुना 1-8 तयार करून अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जातील आणि 26 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. दिनांक 3 जानेवारी 2023 पर्यंत यादी अंतिम छपाईला पाठविण्यात येईल आणि दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी  मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईलअसे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.

000


पुरस्कार

 महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान.

          नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

              बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

                  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

हॉस्पिटल उभारणी

 सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनीघेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

          मुंबई, दि. 29 : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली.

          यावेळी सिक्कीमचे पर्यटन मंत्री बी. एस. पंत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

          सिक्कीम राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असतात, या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी सिक्कीम सरकारच्या वतीने नवी मुंबईत 'सुस्वास्थ्य भवन' बांधण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

०००

सुविधा

 पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना

जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

          मुंबई, दि. 29 : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

          देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

          अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

००००



 



उद्योग

 इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उद्योग वाढीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

          मुंबई दि. 29 : मागास भागांत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

          इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर येथे वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रूपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.

          सह्याद्री अतिथीगृह येथे या भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळात इंडोरामाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल लोहीया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधिंद्र राव यांचा समावेश होता. श्री लोहीया यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मरणचिन्ह देऊन सन्मानित केले.

००००



Featured post

Lakshvedhi