जनावरांतील लम्पी त्वचारोगाबाबत प्रतिबंधात्मक सूचना पशुसंवर्धन विभागाकडून जारी.
मुंबई, दि.4 : गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोगाचा (लम्पी स्किन डिसीज) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रील्पॉक्स (CapriPlox) या प्रवर्गात मोडतात. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षण
म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळे मार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी करिता नमुने घेणे आवश्यक आहे.
या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानव संक्रमित होत नाही. ह्या आजाराची देशी वंशाच्या जनावरापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची जास्त शक्यता असते.
संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. संक्रमित जनावरांचे विविध स्त्राव, डोळ्यातील पाणी, नाकातील स्त्राव, लाळ इत्यादींमधून, चारा व पाणी दुषित होवून जनावरांना या आजाराची लागण होते. विर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग याद्वारेही याची लागण होऊ शकते. तसेच या आजाराचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होतो. त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जीवंत राहतो.
लम्पी त्वचा रोगामध्ये जनावरांना ताप येवून त्वचेखाली विशेषत: डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात, तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यामध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.
हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.