Friday, 29 July 2022


 



 

 


घरो घरी तिरंगा

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी.

            मुंबई, दि. 27 : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’अंतर्गत देशभरात दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम साजरा होणार आहे. या उपक्रमाकरीता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठवि‍लेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे.

            दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व शासकीय / निमशासकीय / खासगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. वरील तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल. घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या सूचना व नियमावलीबाबत नागरिकांत जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेवून स्थानिक वृत्तपत्रांत बातम्या, स्थानिक केबल, रेडीओ चॅनल, सोशल मीडीया, होर्डींग्ज, बॅनर इत्यांदी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी.

            घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या संकेतस्थळावर IEC आयईसी साहित्य उपलब्ध असून http://mahaamrut.org/Download.aspx या लिंकवरुन माहिती, शिक्षण व संवाद साहित्य डाऊनलोड करावे. गावस्तरापर्यंत झेंडे वितरण, संकलन आदी कामांची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

०००००

राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी.

            मुंबई, दि. 28 : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.

             ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास / नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.

             स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

GST


 अन्नधान्य खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी संबंधी नवीन नियमात आवश्यक त्या दुरुस्त्या करू : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन.

नवी दिल्ली: जीएसटी कौन्सिलच्या शिफारसी वरून केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या अन्नधान्य,खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी आकारणी संबंधी या अधिसूचनेमध्ये असलेली क्लिष्टता दूर करून सामान्य ग्राहक व छोटे व्यापारी यांना याचा बोजा होणार नाही अशा पद्धतीने आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर या राज्यातील व्यापार,उद्योग व कृषी उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी खासदार हेमंत गोडसे व शिष्टमंडळासह अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेऊन नवीन केलेली कर आकारणी रद्द करण्याची मागणी केली त्याप्रसंगी ते बोलत होते.

ललित गांधी यांनी याप्रसंगी व्यापारी व ग्राहक यांच्या वतीने भूमिका मांडताना कमी प्रमाणात खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहक व छोटे व्यापारी यांच्यावर या कराचा नवीन भुर्दंड पडणार आहे. पॅकिंग न करता विकलेल्या मालावर कर आकारणी होणार नसली तरीही सध्याच्या काळामध्ये पॅकिंग न करता वस्तू विकण्याची पद्धत जवळपास कालबाह्य झालेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता व अन्नधान्य खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी त्यांचे पॅकिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे कराचा बोजा हा सामान्य ग्राहकाच्या वर पडणार आहे तसेच या कर रचनेमध्ये विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्याने छोटा व्यापारी या गोष्टींची पूर्तता करताना अडचणीत येणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनीही या कायद्यामध्ये बदल करून सामान्य ग्राहक व छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा असे आग्रही प्रतिपादन केले.

अर्थ मंत्रालयातील कर विभागाचा प्रभार असलेले अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने मांडलेली भूमिका योग्य असल्याचे मान्य करताना सांगितले की, केंद्र सरकारचा अशा प्रकारे अन्नधान्यावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता.

जीएसटी कौन्सिल मध्ये विविध राज्यांनी सातत्याने मागणी केल्याने, तसेच पूर्वीच्या कर उत्पन्नात घट झाल्याची माहिती समोर आल्याने सर्व पक्षांच्या अर्थमंत्र्यांच्या समावेश असलेल्या समितीने अशा प्रकारे कर करण्याचा प्रस्ताव सादर केला ज्याला जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिल्याने कर आकारणी सुरू झाली आहे.

मात्र या कर आकारणीच्या प्रक्रियेमध्ये, यासंबंधीच्या आदेशामध्ये अनेक क्लिष्टता व विसंगती असल्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले व यासंबंधी सर्व तांत्रिक बाबींचा तपशील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सादर करावा अशा सूचना केल्या. यासंबंधीच्या सर्व सूचनांचा योग्य विचार करून ताबडतोब यासंबंधीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या युवा उद्योजक समितीचे प्रमुख संदीप भंडारी, चेंबरचे दिल्ली प्रतिनिधी जे.के.जैन यांचा समावेश होता.

तत्पूर्वी ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्याच्या मागणीस अर्थ मंत्रालयकडे शिफारस करण्यासाठी जेष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड,खासदार धनंजय महाडिक,खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक यांच्या समवेत स्वतंत्र बैठका घेऊन याविषयी सहकार्य करण्याची मागणी केली. ज्याला सर्वच मान्यवरांनी स्वीकृती देऊन हा कर रद्द करण्याची शिफारस करू असे आश्वासन ललित गांधी यांना दिले

*फोटो कॅप्शन: केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या समवेतच्या बैठकीत अन्नधान्यावरील जीएसटी संबंधी भूमिका मांडताना ललित गांधी, सोबत खासदार हेमंत गोडसे, संदीप भंडारी*

श्रावण आला रे घरी

 


Featured post

Lakshvedhi