*काय ती शाळा... काय ते गुर्जी... काय त्यो मार.... आरारारा खतरनाक...!*
आमची मराठी शाळा विठ्ठल मंदिरात भरायची. दर शनिवारी शाळा शेणानं सारवायची, मग आमच्यात गट पाडायचं. शेण कुणी आणायचं तर ज्याला जनावरं कुठं आहेत हे माहीत आहे त्यानं, पाणी आणायला जरा तगडी पोरं आणि राहिलेल्यांनी जमीन लोटायची आणि सारवायची!शनिवारीच का तर सोमवार पर्यंत ती वाळायची!
आमचं गुर्जी लै भारी हूतं. शाळेला उशीर झाला की अशा छड्या बसायच्या की आमी बोंबलायचो, गुर्जी छडी अशी मारायचं की हाताच्या खालनं आणि वरनं, कळ आशी यायची की बापजादे आठवायचे!ह्ये गुर्जी येवढं लवकर मरु देत असं आमी मनातल्या मनात म्हनायचो. तोंडावर बोलायची हिंमत आमच्यात कुठली!
मराठी शाळा आणि शिक्षा हे ठरलेलं गणित!गुर्जी आदल्या दिवशी सांगायचं उद्या मी उजळणी घेणार आहे, तयारीत या. आमच्या अंगावर काटं उठायचं, कारण गुर्जी प्रश्न विचारायचं एक एक करुन, शेवटी जो उत्तर सांगल त्येनं न उत्तर दिलेल्यांस्नी नाक धरून गालावर मुस्काटात मारायची!गाल लालभडक व्हायचा!आमच्यातली कांही हूशार पोरं डाव काडायची!
आनी कुनाला उत्तर न्हाय आलं तर दोन्ही हाताची बोटं एकमेकांत अडकवून खुट्टीला टांगायचं, आय आय आयचं डोस्कं आउट व्हायचं!आमी बोंबलायचो पन गुर्जी आसं खवळायचं आनी छडीनं टिरीवर हानायचं!
ग्रुहपाठ ही आमाला पीडा वाटायची, तो न्हाय केला तर गुर्जी पायाचं आंगठं धरायला लावायचं!लय चुळबूळ केलीच तर पाठीवर छडी ठेवायचं, छडी पडली की पुना त्याच छडीनं टिर शेकायचं!अक्षरशः मला कुटलंबी काम सांगा परं शाळा नको असं वाटायचं!
परं तवा गुर्जींची तक्रार घरात सांगायची सोय नव्हती, कारण बापच पुना फोकाटीनं फोकलून काडायचा, त्याचा आमच्या पेक्षा गुर्जीवर दांडगा ईस्वास!आम्ही हुतोच तसं गुनी!
गुर्जी कदी कदी आमच्या मळ्याला सुद्दा यायचं, गुर्जी मळ्याला आलं की आमच्या पोटात गोळा उटायचा!आता आनी ह्यो बापाला काय सांगतुय का काय?म्हनून मी दडून बसायचो, पन आमचा बाप हमखास बोलवायचा, गुर्जीस्नी हारबुर आन, गुळ शेंगदानं दे आनी येवडं कमी का काय म्हनून आईला जेवान करायला सांग!आसं फर्मान सुटायचं. गुर्जी मळ्यातनं जाऊस्तवर माजी धाकधूक काय थांबायची न्हाय!गुर्जी येथेच्छ पाहूणचार घेऊन निघाले की माझा जीव भांड्यात पडायचा!
एक मात्र नक्की माझ्या गुर्जीनी कदी दुस्कान माज्या बापाला माजी तक्रार सांगिटली न्हाय!
मित्रांनो, विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज आपण कोणते शिक्षण आपण घेत आहोत? *छडी लागे छमछम विद्या येई घमघम!* हे आपण विसरून गेलोय. आमची शाळा, आमचे शिक्षक, आमचे संस्कार आणि संस्कृती आपण विसरून जात आहोत. आज शिक्षकांनी मुलांना हात लावला तरी पालक आकाश पाताळ एक करतात हे चित्र बरोबर नाही!कुंभार मडके घडवत असताना बाहेरून लाकडी ठोकणीने ठोकत असतो तेव्हा आतून हाताला कपड्यांची गुंडाळी केलेला हात आधार देत असतो कारण मडके फुटता कामा नये, ही काळजी असते. आई वडील यांचा एक मुलगा/मुलगी शिकत असते परंतु शाळेतील सर्व मुलांचे पालकत्व शिक्षकांनी घेतलेले असते हे आम्ही विसरत आहोत. एखादी चुक मुलांनी केली तर आपण सहजच तुला शाळेत हेच शिकवले का?म्हणतो पण शाळा सहा सात तास असते बाकी तो तुमच्याच ताब्यात असतो हे आपण सोईस्कर पणे विसरतो.
जसे डॉक्टर पेशंटचा देव असतो, तसाच विश्वास शिक्षक आणि शाळा यांच्यावर असायला हवा!,पटतंय की नाही?👌🏾👌🏾👍🏽👍🏽