Wednesday, 1 June 2022


भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त

            मुंबई, दि.1 :राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन शासनास योग्य शिफारस करण्यासाठी महसूलचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.

            महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव किंवा सचिव स्तरावरील अधिकारी या समितीत सदस्य असतील. याशिवाय विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, पुण्याचे विभागीय आयुक्त, नाशिकचे विभागीय आयुक्त, नागपूरचे विभागीय आयुक्त या समितीत सदस्य असतील. महसूल व वन विभागाचे उपसचिव या समितीचे सदस्य सचिव असतील.

            राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनीचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींच्या वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे ही या समितीची कार्यकक्षा राहणार आहे.

            महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल सादर करण्याकरिता मदत करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उपसमिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनींच्या वापराची सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनींचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींच्या वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे हे या समितीचे काम असणार आहे.


द्वारका


 


 


 




स्पेन संस्कृत prarthna

 स्पेन मधील रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी म्हटली जाणारी संस्कृत प्रार्थना, जी संपूर्ण युरोप मध्ये ऐकली जाते... एकदा डोळे बंद करून ऐका आणि मनःशांती अनुभवा.

🙏🏽😊🙏🏽




 जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबतचा विस्तृत आराखडा सादर करावा

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख.

            मुंबई,‍ दि. 31 : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबतचा विस्तृत आराखडा तयार करुन हा आराखडा प्राधान्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

            जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            जळगाव येथे नेमून दिलेल्या कालावधीत महाविद्यालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे करीत असताना एचएससीसी कंपनीने महाविद्यालय उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आणि आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करुन तांत्रिक मान्यतेसह मंजूर करुन घ्यावेत, अशा सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.

०००

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सप्टेंबरपर्यंत

बांधकाम पूर्ण करावे

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 31 : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह एचएससीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री.देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली असून यानुसार काम सुरु आहे. एचएससीसी कंपनीची टर्न की तत्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पुढील 3 महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी (स्टॅबिलिटी) स्थिर कालावधी असा ठरविण्यात आला आहे. गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता मात्र बांधकामाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. नेमून देण्यात आलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी एचएससीसीच्या प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन सप्टेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करावे, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

०००



 ३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना द्यावी

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

गिरणी कामगारांच्या "सर्व श्रमिक संघटने"च्या शिष्टमंडळासोबत चर्चा.

            मुंबई, दि. 31 : म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांचे देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            गिरणी कामगारांच्या घर वाटप व त्यांच्या पुनर्वसन संदर्भातील अडचणीं जाणून घेण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

            यावेळी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी योगेश म्हसे, एमएमआरडीएचे मोहन सोनार, गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या "सर्व श्रमिक संघटने"चे अध्यक्ष उदय भट, संघटनेच्या गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी. के. आंब्रे, संघटनेचे पदाधिकारी संतोष मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

         यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या वितरित केल्या जाणाऱ्या घरासंदर्भातील वाटपाबाबतचे विविध प्रश्न विशेषतः दुबार अर्ज, वाटप केलेल्या कामगारांना अद्याप ताबा न मिळणे, अनेक घरे नादुरुस्त असणे व अनेक कोर्ट कचेऱ्यामुळे होत असलेला लॉटरीचा विलंब याबाबत आपले म्हणणे मांडून डॉ. गोऱ्हे यांना निर्माण होत असलेल्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

            डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, गिरणी कामगारांच्या घरांबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) सोबत लवकरच बैठक घेण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रातील अतिरिक्त जमिनींच्या दाव्यांबाबतची सध्यस्थिती मुंबई महानगर पालिकेकडून जाणून घेण्यासाठी त्याबाबत बैठक घेण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी म्हाडाला केल्या.

            गिरणी कामगार संघटनेकडून लाभार्थी यादींबाबत त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून गिरणी कामगारांवर अन्याय होत असल्याचे सांगीतले. एकाच लाभार्थीला विविध ठिकाणी लॉटरी लागत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी म्हाडाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी बैठक घेऊन यादीतील नावांची छाननी करावी. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दुबार आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे आधार कार्ड व पत्ते यांची तपासणी करुन अशी नावे वगळून, यादी सुधारित करण्याच्या सूचना केल्या.

          गिरणी कामगारांसाठी तयार करण्यात आलेली पनवेल येथील घरे अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याच्या तक्रारीही संघटनेने उपस्थित केल्या. संबंधित घरे तीन महिन्यांत दुरुस्त करुन लाभार्थीना वितरित करण्यात यावीत, अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

            म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ योगेश म्हसे म्हणाले, मुंबई, मुंबई उपनगर व रायगड जिल्ह्यात 110 हेक्टर जागेची पाहणी करण्यात आली असून महसूल व वन विभागाकडे त्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्याच्या किंमती किती असाव्यात हे देखील लवकरच निश्चित करण्यात येईल.काही घरांच्या वारसांचाही प्रश्न असून त्यावरही लवकरच निर्णय घेणार येईल. तसेच विविध पर्याय विचारात घेवून जास्तीत जास्त कामगारांना घरे वाटप करण्याचा प्रयत्न म्हाडा करत असल्याचे श्री. म्हसे यांनी सांगितले.


Featured post

Lakshvedhi