Thursday, 5 May 2022

 उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्याशिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

            मुंबई, दि. 4 :- राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

            मंत्रालयातील समिती सभागृहात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, उद्योग विभागाचे विकास आय़ुक्त हर्षदिप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात गुंतवणूक यावीच असेच प्रयत्न व्हावेत. पण आलेल्या उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी मिळायला हव्यात. त्यादृष्टीने या उद्योगांसबंधीच्या धोरणातच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाबाबत विचार करायला हवा. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कौशल्य विकास तसेच अन्य काही विभागांशीही समन्वय राखावा लागेल. जेणेकरून उद्योगाला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आपल्या तरुणांना रोजगार संधी मिळेल. त्यासाठी संस्थात्मक असे प्रय़त्न करावे लागतील. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा या धोरणातच समावेश करावा लागेल. हे धोरण दीर्घकालीन असावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

            उद्योग मंत्री श्री. देसाई यांनी औद्योगीक वसाहतीतच असे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे सांगितले.

            यावेळी कौशल्य विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या समन्वयाने शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना उद्योगांतील प्रशिक्षणासाठी गुणात्मक (क्रेडीट लींक) करणे, स्थानिकांना उद्योगांत प्राधान्य मिळेल अशी तरतूद यांसह रोजगार संधी, निर्यातक्षमता याबाबतही चर्चा झाली.

०००००



 

Wednesday, 4 May 2022

 माणसाने बनवलेल्या पहिल्या लसीची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ०४)


देवीचा रोग म्हणजे महाभयंकर. लागण झालेले तिसरा हिस्सा लोक मरायचे. उरलेल्यांचे डोळे जायचे, नाहीतर शरीर, चेहरा विद्रूप व्हायचा. असं काहीच न झालेला माणूस विरळाच. अगदी भारतात, महाराष्ट्रात दोन-तीन पिढ्यांपूर्वीपर्यंत त्याचा फैलाव होता. या भीषण रोगावर सव्वादोनशे वर्षांपूर्वी लस निघाली आणि मानवजातीने सुस्कारा टाकला. जगातली ही पहिली लस. पुढे विविध लसी विकसित होत गेल्या. ही पहिली कशी तयार झाली याचा इतिहास भलताच रंजक आहे.

त्याचीच गोष्ट सांगताहेत, वरिष्ठ सूक्ष्मजीव वैज्ञानिक डॉ. योगेश शौचे. भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील चौथी गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Story-of-First-Vaccine

आपल्या भवतालाविषयी दर्जेदार वाचन करण्यासाठी : bhavatal.com


(आपण वाचा, इतरांसोबतही शेअर करा)


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी

                                                            -राज्यपाल 

        मुंबई, दि. 3 :- युद्ध व शस्त्रास्त्रे ही देशाची सच्ची शक्ती नसून संस्कृती हीच भारताची सौम्य संपदा आहे. संस्कृतीला आधारभूत मानून सर्जनशीलतेला चालना दिल्यास आपण अजरामर कृती तयार करू शकू असे सांगताना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 'भारतीय सिनेमा व सौम्य संपदा' या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.  

            भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते तसेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. दिशान कामदार, प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.   

            भारतीय सिनेमाच्या सौम्य संपदेमुळेच अनेक देशातील लोकांना भारतीय भाषा समजत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानामुळेच रामायण व महाभारत यांवर आधारित धारावाहिक सर्वाधिक चालल्या, असे राज्यपालांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण तसेच आज जगभर मान्यता पावलेला भारतीय योग देशाच्या सांस्कतिक संपदेचे द्योतक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून ते चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            भारतीय कथानक जगभर पोहोचविण्यासाठी युवकांना तंत्र सक्षम करावे : शेखर कपूर

        आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरीता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे, असे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

            डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच डॉ. दिशान कामदार यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

     चर्चासत्रामध्ये सिनेमातील वसाहतवाद : पाश्चात्यांच्या नजरेतून जागतिक व भारतीय सिनेमा, भारताचा मूलभूत विचार आणि चित्रपटाचे माध्यम, भारतीय सिने संगीतावर जागतिक परिणाम व लता मंगेशकर यांची गाणी या विषयांवर सत्र होणार आहेत. चर्चासत्राचा समारोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.        



 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अँग्रिकल्चर व जीतोतर्फे ‘जीतो कनेक्ट पुणे ’मध्ये ७ मे २०२२ रोजी 'राष्ट्रीय व्यापार महापरिषद'

--------------------------------

व्यापार धोरण, भविष्यातील संधी यासंबंधी चर्चा होणा

केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, अमिताभ कांत व अशोक दलवाई मार्गदर्शन करणार.

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अँग्रिकल्चर व जीतो यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषद व ट्रेड फेअरमध्ये 'बिझनेक्स्ट' या 'राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे' आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ७ मे २०२२रोजी ही राष्ट्रीय व्यापार परिषद होणार असून यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व भारत सरकारच्या 'राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरण' चे सीईओ अशोक दलवाई उपस्थित राहणार आहेत.

जीतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चर यांच्या वतीने व दि पूना मर्चंट्स चेंबर आणि पुणे व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापरिषद शनिवारी दि. ७ मे २०२२ दुपारी 3.30 वाजता होणार आहे, अशी माहितीही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

नीती आयोगाच्या माध्यमातून देशाचे धोरण निश्चितीचे काम होत असल्याने या परिषदेनिमित्त नीती आयोगाचे अमिताभ कांत यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार आहे. पुढील काळात देशाचे व्यापार धोरण कसे असेल हे त्यांच्याकडून समजण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर हे युवा नेते उपस्थित राहणार आहेत. देशाच्या राजकारणातील त्यांचे योगदान पाहता केंद्र सरकारची व्यापारासंबंधीची दिशा समजण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेले कृषी धोरण ठरविण्यामध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी अशोक दलवाई यांचे योगदान मोठे आहे. या परिषदेमध्ये कृषी आधारित उद्योगातील नवीन संधी संदर्भातही महत्वाची चर्चा होणार आहे असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

कोरोना काळात इतर क्षेत्राप्रमाणेच व्यापार क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत होत असलेल्या 'बिझनेक्स्ट' राष्ट्रीय व्यापार महापरिषदेमध्ये व्यापार क्षेत्रातील भविष्यातील संधीविषयी सविस्तर चर्चा होणार आहे. पहिल्यांदाच व्यापार क्षेत्रातील चार मोठ्या संघटनांनी एकत्र येऊन अशा प्रकारची परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह देशभरातील व्यापारी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी होणारी ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. मात्र, त्यासाठी नावनोंदणी करण्याची आवश्यकता असून जीतो कनेक्ट 2022 च्या संकेतस्थळावर जाऊन ही नावनोंदणी करता येईल, असे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.



 

भगवद् गीता

 


जागते राहो


 

Featured post

Lakshvedhi