सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 30 April 2022
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र
आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द
देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी व्यक्त केले समाधान
मुंबई, दि 30 :- नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपुर्द केले. प्रारंभी त्यांनी पहाटे व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली तसेच आपल्यासमवेतचे पत्र चरणी अर्पण केले.
आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले. त्यांनी प्रारंभी पद्मावती दर्शन केले.
यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी , देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे राहुल कनाल, सूरज चव्हाण व देवस्थानाचे इतर अधिकारी हे देखील उपस्थित होते.
तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर सिडको तसेच राज्य शासनाने अतिशय कमी कालावधीत याविषयीचा निर्णय घेऊन जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे.. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला आले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.
तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन
राज्याच्या विभागीय स्तरावर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी उद्घाटन
मुंबईत वरळी व जुहू येथे प्रदर्शन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
मुंबई, दि. 30 :- कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनांचे उद्या दि.1 मे रोजी उद्घाटन होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत.
दि. 1 ते 5 मे, 2022 या कालावधीत 5 दिवस ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी दिवसभर खुली राहणार आहेत.
'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वरळी सी फेस येथे तर मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जुहू बीच येथे होणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर सह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर येथे याच कालावधीत या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे.
शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.
000
एमटीडीसी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती;
निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी
मुंबई, दि. २९ :- आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी- सवलती देण्यात येणार आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोविड नंतर एमटीडीसीची सर्वच पर्यटक निवासे/ रिसॉर्टमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. महामंडळाचे कर्मचारी आदरातिथ्य आणि विविध उपक्रमांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन तयार झाले असल्याने पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. महामंडळाने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असून तब्बल दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद दिला जात आहे.
महामंडळाने सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती आहेत. तसेच पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट’चीही सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.
एमटीडीसीकडून पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती संकेतस्थळावर, फेसबूक आणि Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. नाशिक, लोणावळा (कार्ला), गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे महामंडळाची जल पर्यटन केंद्रे असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे देखील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचेही प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे. एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले असल्याची माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.
००००
महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत महाराष्ट्र दिनाचा हा समारंभ आयोजित करण्यात आला असून आज या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव भरत गावडे यांनी ध्वजारोहण केले.
आज झालेल्या रंगीत तालमीत अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) एस. जयकुमार, राजशिष्टाचार विभागाचे संबंधित अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रंगीत तालमीत झालेल्या संचलनात संचलन प्रमुख अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, संचलन उप प्रमुख सायबर क्राईम चे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, ध्वजाधिकारी सशस्त्र पोलीस वरळी चे राखीव पोलीस निरीक्षक रमेश लोखंडे, जीप नियंत्रक मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक निंबाळकर यांच्यासह राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस निशाण टोळी, राज्य राखीव पोलीस बल निशाण टोळी, मुंबई अग्निशमन दल ध्वज, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, ब्रास बॅण्ड पथक, पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई अश्वदल पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक) तसेच मुंबई अग्निशमन दल वाहने- आर्टिक्युलेटेड वॉटर वाहन (AWT), मोबाईल वॉटर ट्रान्स्पोर्टेशन वाहन (MWT), हाय राईझ फायर फायटिंग वाहन (HFFV) या पथकांनी सहभाग घेऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
00000
बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करणार.
- एकनाथ शिंदे
'नरेडको' आयोजित 'महाराष्ट्र रिअल इन्स्टेट फोरम 2022.
मुंबई, दि. 28 :- बांधकाम क्षेत्र हे शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील सर्व अडचणी नगरविकास विभागाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दिली. बांधकाम क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या 'नॅशलन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल' च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'नरेडको महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम २०२२' या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच क्षेत्रांना बसला तसा तो बांधकाम क्षेत्राला देखील बसला, अनेक विकासकांची परिस्थिती या काळात अतिशय अवघड झालेली होती. त्यामुळे या काळात या क्षेत्राला दिलासा देण्याची गरज होती. बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकांना मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. तसेच विकासकाकडून आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम मध्ये देखील ५० टक्क्यांनी कपात केली. या निर्णयाचा मोठा फायदा विकासकांना मिळाला तर सरकारच्या महसुलात देखील मोठी भर पडली. तसेच मुद्रांक शुल्क माफ झाल्याने वाचलेल्या पैशातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरातील लागणाऱ्या काही वस्तू घेता येणे शक्य झाले, असेही नगरविकास मंत्री यावेळी म्हणाले.
नगरविकास विभागाने ३ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात लागू केलेल्या युनिफाईड डिसीपीआरमुळे संपूर्ण राज्यात बांधकामासाठी समान नियम लागू झाले. तसेच या तरतुदींमध्ये इमारतींची उंची वाढवण्याची मर्यादा देखील शिथिल करण्यात आली तसेच एफएसआय देखील मुबलक प्रमाणात वाढवून देण्यात आला. या सगळ्यांचा मोठा फायदा राज्यातील विकासकांना झाला. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी देणारे हे निर्णय ठरल्याने या कार्यक्रमात शिंदे यांना बांधकाम व्यावसायिकांनी उभे राहून मानवंदना दिली. बांधकाम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेली ही कृती पाहून मंत्री श्री. शिंदे पुरते भारावून गेले त्यांनी अत्यंत विनम्रपणे या सन्मानाचा स्वीकार केला. तसेच यापुढे देखील या क्षेत्राचा विकासासाठी असेच सहकार्य करत राहू, अशी ग्वाही दिली.
राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील नगरविकासमंत्र्यांनी यावेळी घेतला. मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात तयार होत असलेले ३३७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे भविष्यात उपयुक्त ठरेल. शहरांतर्गत असलेले रस्ते मोठे करणे करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी न्हावा -शेवा सी लिंक असेल किंवा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प असेल, किंवा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर तयार होत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे शहरातील अंतर कमी होणार आहे. तसेच या सर्व प्रकल्पामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून त्याचा बांधकाम क्षेत्राला देखील मोठा लाभ होणार आहे, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात देशातील पहिला क्लस्टर प्रकल्प साकारला जात असून या प्रकल्पाद्वारे दीड हजार हेक्टर जमिनीवर संपूर्णपणे सुनियोजित असे नवे शहर साकारले जाणार आहे. ठाणे महानगरपालिका तसेच सिडकोच्या वतीने आम्ही हा प्रकल्प साकारत असलो तरीही नरेडकोच्या सदस्यांनी देखील त्यात नक्की सहभागी व्हावे त्यांना नक्की इतर सवलती नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'नरेडको'चे अध्यक्ष संदीप रूणवाल, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, प्रख्यात वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर आणि 'नरेडको महाराष्ट्र' चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
०००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...