Wednesday, 20 April 2022

 मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय.

-.                                                  दत्तात्रय भरणे.

        मुंबई, दि. 20 : मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे तसेच मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करणे. तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना या राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

            मंत्रालयातील दालनात मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासचे सहसचिव माणिक गुट्टे, अवर सचिव विकास कदम, उपायुक्त डॉ.शैलेशे पेठे, विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंच अमरावतीचे संस्थापक संतोष महात्मे, जानराव कोकरे, नितीन कानडे, नंदकुमार गांजे, अर्जुन थोरात, राहुल हजारे, अंकुश मुंढे, चंद्रकांत हुलगे, बापू पुजारी, हरिभाऊ शिंदे, शरद शिंदे, म्हस्कू कारंडे, गोमा काकडे, पांडुरंग कावळे यावेळी या बैठकीला उपस्थित होते.

              राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, मेंढपाळ आणि वन विभागाच्या संघर्षाच्या तक्रारी वारंवार येत आहेत. हे लक्षात घेता वन विभागाकडून मेंढपाळांवर वन क्षेत्रात चराई करण्याकरिता शासनाच्या आदेशान्वये बंदी आहे तरी शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडचे बांधकाम व मोकळ्या जागी पिण्याचे पाणी, चारा, बियाणे, बहुवार्षिक गवत प्रजातीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत योजना प्रस्तावित कराव्यात अशा सूचना यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत दिल्या.

मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधन विम्याचे कार्यक्षेत्र वाढविणार.

            राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, मेंढपाळाना देण्यात येणाऱ्या पशुधनविमा योजनांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून मेंढपाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी लवकरच विभागस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात ७३ तालुक्यात फिरते पशु चिकीत्सालय आहेत लवकरच ८० तालुक्यात ही सुविधा वाढविण्याचा शासनाचा विचार आहे. फिरते पशु चिकीत्सालयाकरिता १९६२ हा टोल फ्री क्रमांक आहे त्याचा लाभ मेंढीपाळांनी घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मेंढपाळांना मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन मेंढपाळांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही करेल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत दिली.

           विदर्भ मेंढपाळ, धनगर विकास मंच, अमरावतीचे संस्थापक संतोष महात्मे यांनी मेंढपाळांचे विविध प्रश्न यावेळी बैठकीत मांडले.

******


 राज्य शासनाचा पिडीलाईट इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

            मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजच्यावतीने आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

            राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

            कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात आज कराराबाबत सविस्तर चर्चा झाली. पिडीलाईट इंडस्ट्रीजचे अरुण उपाध्याय यांनी सविस्तर सादरीकरण करुन पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मैसन आणि इंटेरियर डेकोरेशन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची खूप मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

            यावर पिडीलाईट इंडस्ट्रीजने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करावे. राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

            राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी भविष्यातील मनुष्यबळ आहे. त्यांना आताच योग्य प्रशिक्षण दिल्यास भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे परिणाम देऊ शकतील. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले.

            हे सर्व प्रशिक्षण उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रम मधून केले जाणार आहे. पिडीलाईट इंडस्ट्रीजने यापूर्वी गुजरात आणि राजस्थान सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांनी सांगितले.

            प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र शासन आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण मिळेल, असे सांगितले.

            यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक योगेश पाटील, पिडीलाईट इंडस्ट्रीजचे संजीव सिन्हा, डॉ. प्रदीप गाडेकर, हर्षद देशपांडे, अरुण चमणकर, हिना शहा आदी उपस्थित होते.

०००००



 



वी देशी

 


 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या


जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट.

            मुंबई, दि. 20 : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही यावेळी श्रीमती जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

            या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र राज्य स्वच्छता कार्यात अग्रेसर राहण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य

- मंत्री गुलाबराव पाटील.

            मुंबई, दि. 20 : देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत मिशन राबविण्यात आघाडीवर आहे. स्वच्छता राखण्यासाठी जनजागृतीमध्ये भविष्यातही राज्य असेच आघाडीवर रहावे यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            स्वच्छ भारत मिशन टप्पा–दोन (ग्रामीण) अंतर्गत ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ या उपक्रमाचा प्रारंभ “मित्रा” या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे केले. या कार्यक्रमास प्रशिक्षकाशी संवाद साधताना मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य यापूर्वीही स्वच्छता मिशन राबविण्यात यशस्वी राहिला आहे. यापुढेही अशीच कामगिरी आपणाकडून होईल अशी आशा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा नारा दिला आणि संत गाडगे महाराज यांनी ग्रामीण भागात ‘स्वच्छतेची चळवळ’ उभी केली होती. या दोन्ही महान व्यक्तींचा आपण आदर्श ठेऊन काम करणे गरजेचे आहे. राज्याला आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 तसेच ओडीएफ (हागणदारी मुक्त अधिक)च्या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छ मोहीम उभी करावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने घनकचरा, मैल गाळ व्यवस्थापन, प्लास्टीक व्यवस्थापन आणि गोबरधन इत्यादी महत्वाचे प्रकल्प आपण राज्यभर राबविणार आहोत. यासाठी आपण ‘मित्रा’ सारख्या देशपातळीवर नावाजलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा संस्थेत आपले प्रशिक्षण पूर्ण करावे असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 चे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

०००


 वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी फ्रान्सलाजाणाऱ्या खेळाडूंना सर्वोतोपरी मदत


                                                     - सुनील केदार

जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा.

            मुंबई, दि. 20 : फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणाऱ्या 19 व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-2022’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज संबंधित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

            या स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी आज मुंबई येथे मंत्री श्री. केदार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भेट घेणाऱ्यांमध्ये आर्यन दवंडे, मानस मनकवले, निशांत करंदीकर आणि सानिका अत्तरदे या चार खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेसाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पुणे येथे मार्च 2022 मध्ये निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या राज्यातून जिम्नॅस्टिकचे 21 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील आर्यन, मानस, निशांत व सानिका हे चार आणि सलोनी दादरकर हिच्यासह एकूण पाच खेळाडूंचा भारतीय संघात समावेश झाला आहे. या स्पर्धेच्या इतर विविध क्रीडा प्रकारांत राज्यातील एकूण 37 खेळाडूंची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आता नॉर्मंडी येथे 14 ते 22 मे 2022 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत 70 देशांतील विविध क्रीडा प्रकारांत एकूण 3 हजार 500 खेळाडू सहभाग घेणार आहेत. 

            ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुलात वयाच्या चौथ्या वर्षापासून आर्यन व मानस आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिकचा सराव करित आहेत. दोघांच्या पालकांची बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. त्यात प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर यांचेही मोलाचे योगदान आहे. आर्यन दहावीत; तर मानस अकरावीत शिकत आहे. या दोघांनी यापूर्वीदेखील विविध स्पर्धेत पारितोषिके पटकविली आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे गेल्यावर्षी त्यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.


००००


 


 



 



 कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करणार

- शंकरराव गडाख.

            मुंबई, दि. 20 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल लघु पाटबंधारे योजनेमुळे येथील स्थानिकांना फायदा होणार आहे, त्यामुळे या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर येथील मौजा कोतवाल प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जलसंधारणाचे अपर आयुक्त सुनिल कुशिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. गडाख म्हणाले, कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण करणे, स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देणे ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. याशिवाय या आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक असलेली सुधारीत प्रशासकीय मान्यता घेऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मंत्री श्री. गडाख म्हणाले.

            विरोधी पक्षनेते श्री. दरेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून या योजनेचे काम सुरु असून हे काम यावर्षी पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित विभागाने कालबद्ध आराखडा तयार करुन काम करावे. योजनेअंतर्गत काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही आणि योजनेचे काम थांबणार नाहीत. याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

०००

कुर्दिश सुलेमानी गव्हर्नर - राज्यपाल भेट

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा : राज्यपाल.

            मुंबई, दि. 20 : इराकच्या कुर्दिस्तान भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ हवल अबूबकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने विशिष्ट अतिथींच्या भारतभेटीच्या कार्यक्रमांतर्गत डॉ. हवल अबूबकर यांच्या भारत भेटीचे आयोजन केले आहे.

            इराकी आणि विशेषतः कुर्दिश भाषिक सुलेमानी लोक भारतीय संस्कृती व लोकांशी विशेषत्वाने जोडले आहेत. भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ व्हावे यादृष्टीने आपण प्रयत्न करू, असे गव्हर्नर डॉ अबूबकर यांनी राज्यपालांना सांगितले.

            भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांमधील संबंध दृढ व्हावे या दृष्टीने एक कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.    

            इराक भारताकडून तांदूळ, कापड, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आयात करत असून उभय देशांमधील व्यापारी संबंध वाढावे या दृष्टीने आपण येथील व्यावसायिक व चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा केल्याचे डॉ अबूबकर यांनी सांगितले.

            इराक मध्ये साधारण: एक लाख भारतीय आहेत. त्यापैकी 35 हजार सुलेमानी प्रांतात राहत असून दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार, वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत.

            सुलेमानी प्रांतातील पर्वतरांगांवर भारतीय देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. जुन्या सुलेमानी लोकांना भारतीय भाषा देखील अवगत होत्या. कुर्दिश भाषेच्या व्याकरणावर पाणिनी यांचा प्रभाव असल्याचे डॉ अबूबकर यांनी सांगितले.

            जगभर ५० लाख कुर्दिश भाषिक लोक राहत असून यापैकी बहुतांश इराकी कुर्दिस्तान येथे राहतात तसेच इराण, तुर्की, व सिरिया येथे देखील राहत आहेत. हे सर्व कुर्दिश भाषिक लोक भाषा व संस्कृतीच्या समानतेच्या धाग्याने बांधले असल्याचे त्यांनी सांगितले. 

            या बैठकीला इराकचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ गाझी अल-तोपी तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालक रेणू प्रिथियानी उपस्थित होते.


०००००



 *देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नाही...* 


एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता . पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते. फकीर गाणी गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता.

त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग समोशांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला.

रसनातृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायलाचे पुन्हा आभार मानले. आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली. पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवळली आणि म्हणाला, `काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली.' असे म्हणत त्याने फकिराच्या सणकन मुस्कटात लगावली. 

काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, `देवा, तुझी लिला न्यारी. कधी गरमागरम जिलबी, समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणीत चपराख!' चिखलाने माखलेला फकीर स्वत:वर हसत हसत उठला. 

त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला. डोके दगडावर आपटले, रक्त येउ लागले. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली. जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, `त्या फकिराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार!'

लोकांना हातसफाईला निमित्त मिळाले. गर्दी फकीराच्या दिशेने धावली. ती त्याला मारणार, तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, `मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा!' गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले. 

त्यावर हसून फकीर म्हणाला, `माझ्या शापाने काय होणारे? हा तर देवाचा हिशोब होता, त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले, तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला!'

 *म्हणून, कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो.* 

*

Featured post

Lakshvedhi