Thursday, 14 April 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली

सातारा जिल्ह्यातील यशस्वी झालेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प

1 मे पासून राज्यात सुरु होणार.

 - शंभूराज देसाई .

1 मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. 13 : शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प 1 मे पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. 1 मे रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

         महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याबाबत गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयातून व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, विशेष पोलीस महानिरीक्षक (ट्रेनिंग) रविंद्र सेनगांवकर, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम प्रसन्ना, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. चेरींग दोरजे, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्यासह साता-याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.

            महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविताना शासनाच्या विविध विभागांचा सहभाग घ्यावा, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत हा प्रकल्प पोहचवावा. शाळेमधील मुलींना त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती देवून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्यात आपले स्वसंरक्षण स्वत: करु शकू असा आत्मविश्वास निर्माण करावा. जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविताना आराखडा तयार करावा. विविध विभागांचा सहभाग घेवून या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. या प्रकल्पात जास्तीत जास्त शालेय, महाविद्यालयीन मुलींचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

            साता-याचे पोलीस अधीक्षक श्री. बन्सल म्हणाले, सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. एका कार्यक्रमामध्ये एका मुलीला महिला पथदर्शी प्रकल्पाचा अनुभव विचारण्यात आला. पोलीस विभागाच्या हा पथदर्शी प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले त्यामुळे आमच्यात आत्मविश्वास वाढला आहे. छेड काढणाऱ्याला तेथेच धडा शिकवू असा आमच्यात आत्मविश्वास असल्याचेही या मुलीने सांगितले. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मुलींचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असल्याचे श्री. बन्सल यांनी सांगून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाबाबत माहिती दिली.

0000

 महत्त्वाकांक्षी योजना आणि प्रकल्पांच्या कामाला वेग द्या.

                                                              - मुख्यमंत्री 

संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला

 सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा.

            मुंबई दिनांक 13 : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज संकल्पकक्षाला भेट दिली, यावेळी त्यांनी सागरी किनारा मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला.

            यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल (दूरदृष्यप्रणाली द्वारे) यांच्यासह इतर मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

            सागरी किनारा मार्गाचे ५२ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम सुरु आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजे नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती श्री. चहल यांनी यावेळी दिली.

            मुख्यमंत्र्यांनी संकल्पकक्षातून आढावा घेण्यात येत असलेल्या योजनांची तसेच कामांची माहिती यावेळी घेतली. यावर्षी शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे. यातील महत्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

      मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक प्रकल्प महत्वाचे आहेत. यापैकी काही योजना तसेच प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांसह आपण संकल्पित केलेले विविध प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावेत यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

            मुख्यमंत्र्यांनी आज माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या टेलिमेडिसीन सुविधेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे काम महत्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या तीनही अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजना तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन कोणत्या योजना पूर्ण झाल्या, कोणत्या मागे राहिल्या आहेत याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

00


 

महामानव

Wednesday, 13 April 2022




 

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सोडतीत पहिले बक्षीस ५१ लाखाचएकूण सर्व बक्षिसांची रक्कम ९८ लाख ५५ हजार.

            मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लॉटरीची १२ एप्रिल रोजी उपसंचालक (वित्त व लेखा) यांच्या कार्यालयात गुढीपाडवा भव्यतम सोडत काढण्यात आली.

             या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले हमीपात्र (सामायिक) बक्षिस रु. ५१ लाख ठेवण्यात आले होते. तर प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रु.२ लाख पहिल्या क्रमांकाची मालिका वगळून उर्वरित चार मालिकांकरीता पहिल्या बक्षिसाचा क्रमांक देण्यात आला आहे. दुसरे बक्षिस रु. ५ लाख (कोणत्याही दोन मालिकांकरीता प्रत्येकी एक स्वतंत्र क्रमांक), तिसरे बक्षिस रू. १० हजार एक क्रमांक, चौथे बक्षिस रु. ५ हजार एक क्रमांक, पाचवे बक्षिस रु.२ हजार एक क्रमांक, सहावे बक्षिस रु.१ हजार दहा क्रमांक (शेवटचे ४ अंक), सातवे रू ५००/- दहा क्रमांक व आठवे बक्षिस रु. ३००/- (शेवटचे ४ क्रमांक) ५५० रॅन्डम क्रमांक असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रु ९८ लाख ५५ हजार इतकी असून सोडतीच्या एका तिकीटाची किंमत रु.२००/- (GST सह) इतकी होती.

            या सोडतीसाठी एकूण दिड लाख तिकीटे छापण्यात आली असून यापैकी सोडत सुरू होण्यापूर्वी दोन तास आधीपर्यंत ना-विक्री अहवालानुसार एकूण १ लाख ५ हजार ६०० इतक्या तिकीटांची विक्री झाली होती. या सोडतीमधून कार्यालयाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रिद वाक्याचा पुरेपुर अवलंब करण्यात आला. या सोडतीमधून सात लोक लखपती बनले असून उर्वरित ५७३ लोकांना हजारोने आर्थिक लाभ झाला आहे.

            या विशेष कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते अरूण कदम यांची उपस्थिती होती. उपसंचालक आ. ज. टोबरे- (वित्त व लेखा), लेखा अधिकारी (लॉटरी) सं. तु. ओहाळ यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.

०००


 



 *विलक्षण  श्रीमंत मराठी  भाषा*......


*रस्ता - मार्ग*

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.


*खरं - सत्य*

*  बोलणं खरं असतं.

* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.


*घसरडं - निसरडं*

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.


*अंधार - काळोख*

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.


*पडणं - धडपडणं*

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.


*पाहणं - बघणं*

* आपण स्वत:हून पाहतो.

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.


*पळणं - धावणं*

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.


*झाडं - वृक्ष*

* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.

* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.


*खेळणं - बागडणं*

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.


*ढग - मेघ*

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.


*रिकामा - मोकळा*

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.😊


*निवांत - शांत*

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.


*आवाज - नाद*

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.


*झोका - हिंदोळा*

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.


*स्मित- हसणं*

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.


*अतिथी - पाहुणा*

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.


*घोटाळा - भानगड*

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.


 *आभाळ- आकाश* 

भरून येतं ते आभाळ.

निरभ्र असत ते आकाश.


आहे की नाही आपली अमृताशीही पैजा जिंकणारी ही मातृभाषा,अतिशय श्रीमंत??😊😊😊🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi