Wednesday, 13 April 2022

 *नोक्टुरिया*

ज्येष्ठ नागरिकांसाठी.. खरे तर सर्वांसाठी! 

लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे.. ! 

 

 नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे *हे हृदयाच्या विफलतेचे* लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

 शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे.  याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.  झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात.  पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं.  त्यांना काय माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे *हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण* आहे.

  खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशय बिघडल्याची  समस्या नाही.  हे वयोमानानुसार वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते, कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास (पुरेसे पंपिंग) सक्षम नाही.

 अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो.  हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो.  म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते.  जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते.  हे पाणी पुन्हा रक्तात येते.  जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते.  हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

 त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा टॉयलेटला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात.  त्यानंतर, जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते, तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा लघवीला जावे लागते.

 आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?

 दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, तसे  श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते.  यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते.  जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते...

 यामुळेच प्रौढ आणि वृद्ध लोकांना नेहमी पहाटे ५-६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते.  या अवस्थेत ते झोपेतच मरतात.

 सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे. म्हणून शक्य झाले तर पायाचा भाग उंचावर राहील अशा पध्दतीने झोपावे.. उठावे लागले तरी पाणी प्यायचे टाळू नये..

खरे तर गोष्ट झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री उठल्यावर पुन्हा लघवी झाली की पुन्हा पाणी प्यावे!

 नॉक्टुरियाला घाबरू नका.  भरपूर पाणी प्या, कारण पाणी न पिल्याने तुमचा जीव जाऊ शकतो..

 तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे. 

 मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल.  अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ टाळा!

  हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा. घरातील जाणत्या तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना पाणी प्यायचा सल्ला द्या!

*वारंवार उठावे* लागते म्हणून पाणी प्यायचा कंटाळा तुम्हास हृदय घात किंवा लकवा भेट देऊन *कायमचे उठवू शकते*  म्हणून रात्री किंवा दिवसा देखील पाणी प्यायचे टाळू नका!

जय हो

 



 प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करावे

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

● जलजीवन मिशन आढावा बैठक

              मुंबई दि 12: पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  

            राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे 71 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा निवासस्थानी जलजीवन मिशन आढावा बैठक झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, सचिव संजीव जयस्वाल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन अभियान संचालक ह्रषिकेश यशोद तसेच पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावीत. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही श्री ठाकरे यांनी दिले.

जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र अग्रेसर - गुलाबराव पाटील

            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी या योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेषत्वाने भर देण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून मिशन अंतर्गतची कामे वेगाने पूर्ण होतील. जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळजोडणी, पाणी गुणवत्ता, संस्थात्मक नळजोडणी व हर घर जल गावे घोषित करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिमही राबवण्यात आली आहे. 

            पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत घरगुती नळ जोडणीसह पुरेशा प्रमाणात निर्धारित गुणवत्तेसह पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट आहे. 

            जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह सर्वच यंत्रणाव्दारे पाणीपुरवठा योजनांची कामे वेगात सुरू असल्याचे सचिव संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

                  जल जीवन मिशन हा केंद्र शासनप्रणीत ५०:५० टक्के सहभागावर आधारित कार्यक्रम आहे. जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन २०२४ पर्यंत "हर घर नल से जल (Piped Water supply)- प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. राज्यातही जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे.

            सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे कमीत कमी ५५ लिटर प्रति माणसी, प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशनच्या राज्यातील अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हास्तर पाणी व स्वच्छता मिशन कार्यान्वयन यंत्रणा आहे. ग्राम पातळीवर जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती यंत्रणा म्हणून ग्रामीण पाणी व स्वच्छता समिती काम करते. राज्यातील १,४६,०८,५३२ ग्रामीण कुटुंबांपैकी १,०३,५२.५७८ (७१ टक्के) ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००


  

 उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

- राजेश टोपे

           मुंबई, दि. 12 :- राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये, उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            वातावरणातील बदल व मानवी जीवन यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त रामास्वामी एन. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील वाढत्या तापमानामुळे उष्माघात, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभाग आणि हवामान खात्याने योग्य समन्वय राखून माहितीचे आदान-प्रदान करावे. यामुळे वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जनजागृती करावी. आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, हवामान खाते आदी विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.


000000



 चांगल्या उत्पादन पद्धतीच्या पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे

औषध उत्पादकांची तपासणी

 

            मुंबई दि. 12 : अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा१९४० व नियम१९४५ ची अंमलबजावणी केली जाते. या कायद्याअंतर्गत राज्यात औषधेसौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन व विक्री यांचे नियमन केले जाते. औषधे उत्पादकांना मंजूर परवान्याअंतर्गत उत्पादन करतांना औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमातील अनुसूची अन्वये विहित करण्यात आलेल्या चांगल्या उत्पादन पद्धती (Good Manufacturing Practices) चे पालन करून गुणवत्तापूर्ण औषधे उत्पादन करणे बंधनकारक आहे.

            राज्यात ॲलोपॅथिक औषधे उत्पादन करणाऱ्या उत्पादक आस्थापना अनुसूची चे  अनुपालन करून औषधे उत्पादन करतात याची पडताळणी प्रशासनाच्या औषध निरीक्षकांद्वारे  नियमित तपासण्याद्वारे करण्यात येते. माहे जानेवारी२०२२ ते मार्च२०२२ या कालावधीत राज्यातील सर्व विभागात ॲलोपॅथिक औषधे उत्पादकांचा तपासणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत राज्यातील कोंकण विभाग ३६६बृहन्मुंबई ५२पुणे विभाग १०४नाशिक विभाग ४३औरंगाबाद विभाग ४७नागपूर  विभाग २२ व अमरावती विभाग २१ अशा एकूण ६५५ उत्पादकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या तपासणी मोहिमेत ९५ उत्पादकांना अनुसूची अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहेत. एकूण १६ प्रकरणात गंभीर दोष आढळून आल्याने सदर संस्थाना पुढील आदेशापर्यंत उत्पादन कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १७ प्रकरणात सुधारणा करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            राज्यातील औषध उत्पादकांनी चांगल्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण औषधांचे उत्पादन करावेजेणेकरून  सर्व सामान्य जनतेस सुरक्षित व प्रमाणित दर्जाची औषधे उपलब्ध होतील, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे नियमित उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. राज्यात उत्पादित होणारी औषधे गुणवत्तापुर्ण व सुरक्षित असण्याच्या दृष्टीने सर्व उत्पादकांनी औषधे, सौंदर्य प्रसाधने कायदा१९४० व त्यांतर्गत नियमातील अनुसूची M (Good Manufacturing Practices) च्या तरतुदींचे अनुपालन करावे यासाठी सर्व विभागीय सह आयुक्त(औषधे) व परवाने प्राधिकारी हे त्यांच्या विभागातील औषधे  उत्पादकांना वेबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहेत.

************

 

 राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

पोलिसांनी सावधगिरी बाळगावी

- दिलीप वळसे पाटील.

            मुंबई दि. 12 : आगामी सण उत्सव काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसदलाने सुसज्ज राहून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, इस्टर संडे या सर्व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव आनंद लिमये,मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, इस्टर संडे आणि रमजान हे सर्व सण - उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी पोलिसांनी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा. त्यांच्या बैठका घेऊन सर्व सुचनांचे पालन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात यावे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत.

            आगामी सण, उत्सव कालावधीत काही अनिष्ट घटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर जरब बसविण्यात यावी.

            अतिशय संवेदनशील असलेल्या विभागामध्ये विशेष खबरदारी घेण्यात यावी. पुरेसा बंदोबस्त तैनात ठेवावा तसेच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

            सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात यावे. आक्षेपार्ह पोस्ट, संदेश प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच अनुचित प्रकार करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. अफवा अथवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. तसेच सामाजिक शांतता धोक्यात येणारी वक्तव्ये कुणीही करू नयेत, असे आवाहन श्री. वळसे पाटील यांनी यावेळी केले.

            यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी केलेल्या पोलीस तयारीचा अहवाल सादर केला.

 दोन कोटी महिलांना सक्षम करणार ॲड. यशोमती ठाकूर

· ‘माविम’तर्फे आयोजित प्रेरणादायी महिलांच्या सन्मान सोहळ्यात घोषणा.

            मुंबई, दि. 12 : महाविकास आघाडीचे शासन माविमच्या माध्यमातून 2 कोटी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करीत असून येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून 2 कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आज महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सह्याद्री अतिथीगृह, येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित "सन्मान प्रेरणादायी महिलांचा" या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

            या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी आणि सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर समीर राऊत आदी उपस्थित होते.

            मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलांमध्ये उद्योगजकतेचा विकास व्हावा, यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

            श्रीमती ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत 1.50 लाख बचतगटाची निर्मिती करुन 17.51 लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी सुमारे 8.50 लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी 80% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.

            श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, माविम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करते. महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते व देश सक्षम होतो.

            या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात माविममार्फत विविध कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी “सेफ्टी ऑडीट” राबविण्यात आले. याची सुरुवात मुंबई शहरापासून केली जाणार आहे. मविम स्टाफ व महिलांसाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेच्या साधन व्यक्ती मार्फत सेफ्टी ऑडिट या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते “महिला सेफ्टी ऑडीट - (Women Safety Audit)” प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सावंत यांनी “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांचे कार्य विषद केले. यावेळी १२ यशस्वी महिला उद्योजक / सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पृथ्वी पाटील - ठाणे, लिला गजरा - पालघर, प्रतिभा सांगळे - बीड, संजीवनी ताडेगांवकर - अकोला, कल्पना किशोर दिवे - अमरावती, मनुताई सुर्यभान वरठी, न्या. निकिशा अशरफखान पठाण - चंद्रपूर, सुषमा केशव पवार - भंडार, मिना हिरालाल भोसले – धुळे, वनिता शिरिष हजारे – पुणे, श्रध्दा कांडोळे, यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

            व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.

------



Featured post

Lakshvedhi