पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे 12 एप्रिल रोजी आयोजन
मुंबई, दि. 11 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे.
ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना यासारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.
या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
००००
देश विदेशातून वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार
विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.
मुंबई, दि. 11 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले.
मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्याना विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरीकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबट्या सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.
0000000