Friday, 8 April 2022

स्वर्गीय आनंद


 

 *स.न.वि.वि.*


सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे *मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय असे कदाचित वाटु शकेल.*

पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. 

*हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते.* एरवी असे शब्द लिहिले जात होते हे सुध्दा विसरायला झाले आहे. उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. *पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.*

खरेच मोबाईल सारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरीही *पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात.* आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली.......😊

*•||• श्री •||•* लिहून पत्राची सुरुवात.

*श्री.रा.रा.* श्रीमान राजमान्य राजश्री.

*स.न.वि.वि.* सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

*तिर्थरुप* आई / बाबा.

*शि.सा.न.* शिर साष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत. 

*कळविण्यास आनंद होतो की.....* असे लिहून पत्राची सुरुवात झाली तर पुढे आनंदाची बातमी आहे *म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)*

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे.......

*कळावे, लोभ असावा.*

*आपला.*

*तुझाच.*

*आपला आज्ञाधारक.*

*मो.न.ल.अ.उ.आ‌.* मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोडपापा घेतला जातोय असा भास व्हायचा.

*हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेन सारखेच झाकण (टोपण) लाऊन जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.* 

त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर *ता.क.* ताजा कलम असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहीली जायची. *त्यात सुध्दा गंमत वाटायची.*

कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेन मुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. 

*आतातर मोबाईल वरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो.*

*खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता आणि आहे.*

पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. *आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.* 

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, *Dear, Sir/Madam,* *Respected Sir/Madam* अशी सुरुवात आणि *Regards, Yours* असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. *कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द.* त्यात नात्यातला ओलावा नाहिच. *Yours faithfully* यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. 😜

यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच *GM, GN* असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनी ची *मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.

*आजकाल फोनवरच बोलणे *(त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल)* होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग काय? कसे काय? बाकी सगळे ठिक आहेत ना? असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.*

पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र *(अंतर्देशीय)* आले की ते व्यवस्थित उघडुन (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणी सारखे त्याचे वाचन व्हायचे. *पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते.* 

कळावे.......


🙏🙏

Thursday, 7 April 2022

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याकर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत.

          मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीची मुदत संपलेल्या लाभार्थींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्यांकरिता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

            राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीचे मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून कर्ज वसुलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

          राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थींचे व्यवसाय बंद झालेले आहेत.त्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थींकरीता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेत 50 टक्के इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.या योजनेस महामंडळाच्या दिनांक 15 मार्च 2022 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

000



 ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार.

        मुंबई,दि. ७: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या  महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने आज दि. ७ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जा व ऊर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला.  या करारावर महाप्रितचे अध्यक्ष बिपिन श्रीमाळी व पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या

             स्वयंरोजगार  निर्मितीच्या संदर्भात दुर्बल घटकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ऊर्जा वापराच्या खर्चात बचत करण्याची योजना या प्रकल्पामध्ये आहे. पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून सौर उर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्बन उत्सर्जन आणि डी-कार्बोनायझेशन कमी करणे, हे देखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाप्रित आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम हा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, ज्याचा पुणे शहरासह समाजातील दुर्बल घटकांनाही उपयोग होणार आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आणि महाप्रित  यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ओळखल्या जाणाऱ्या पात्र उद्योजकांना स्थानिक उद्योजकता सुरु करण्यास समर्थन देण्याचीही या प्रकल्पाची कल्पना आहे.  कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा खर्चात बचत करण्यासाठी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही असे प्रकल्प हाती घेण्यास त्यामुळे चालना मिळे

       यावेळी  महाप्रितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले की, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होईल. त्यामुळे भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चात बचत होई

            पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रमकुमार यांनी या प्रकल्पाचा पुणे महानगरपालिकेला खूप फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करुन महाप्रित सोबत सामंजस्य करार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले

      यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.श्री. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत)पुणे महानगरपालिका श्रीमती मनीषा शेकटकर, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, महाप्रित, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, जनसंपर्क अधिकारी सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि मिलिंद अवताडे हे उपस्थित हो


००

००ते..ल.ल..

 


००००



 तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरूंनी सहकार्य करावे

                                                                                                                                  श्रीकांत देशपांडे.

            मुंबई, दि. 6 : देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथियांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ 3 हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज केले.

            मुंबईतील भायखळा येथे तृतीयपंथीयांच्या गुरूंच्या वसाहतीत जाऊन मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरू, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर मॉ संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.

            तृतीयपंथीयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या भिन्न असून त्याबाबत राज्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती असायला हवी. यासाठी राज्यभरातील तृतीयपंथीयांचे गुरू, शासकीय अधिकारी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांची राज्यस्तरीय परिषद घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रितपणे सादर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकरिता फेलोशिप देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले. आजच्या घडीला तृतीयपंथीयांची मतदार यादीतील नोंदणी अल्प असल्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात जवळपास 10 लाख तृतीयपंथी असून या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास त्यांना येत असलेल्या समस्या सहज दूर होऊ शकतील, असे मतही श्री.देशपांडे यांनी व्यक्त केले.

            तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून मुंबई शहरात त्यांच्या निवासाजवळ शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ज्या तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद तृतीयपंथी म्हणून केली नसेल, तर अशानींही आपल्या मतदान कार्डात तृतीयपंथी म्हणून बदल करावा, असे आवाहनही श्री.देशपांडे यांनी यावेळी केले.

            मुंबई जिल्हाधिकारी श्री. निवतकर यावेळी म्हणाले, संपूर्ण राज्यात तृतीयपंथी हा वंचित घटक असून त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी सर्व तृतीयपंथीयांच्या नावाची नोंदणी मतदार यादीत असावी, याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. या मतदान कार्डामुळे आपणास मतदानाच्या पवित्र अधिकाराबरोबर वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व तृतीयपंथीयांनी मतदान कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन श्री.निवतकर त्यांनी केले.

००००



 

 कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी.

                                  मुंबई शहर जिल्ह्यात उपक्रम.

            मुंबई, दि. 7 : कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना माहिम येथील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल येथे “होम हेल्थ एड” या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला व बाल विकास कार्यालयाकडून पुरस्कृत विधवा महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते या महिलांना प्रमाणपत्र देऊन हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.

            प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करून देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशिक्षणार्थी वैभवी कडू, पल्लवी मोरे यांनी आभार व्यक्त केले. या महिलांना दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर या दोन्ही महिलांना आता पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अटेंडंट पदावर नोकरी देण्यात आली आहे. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल, कौशल्य विकास समन्वयक हितेश हिरे व हिंदुजा हॉस्पिटलच्या वरिष्ठ मॅनेजर भावेशा खरनारे यांनी नियोजन केले .

            कोरोना माहामारीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पारिस्थितीमुळे आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव जाणवू लागला होता. यासाठी शासनाने आरोग्यसेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम” घोषित केला. मुंबई शहर जिल्ह्याला 600 प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. हे उद्दीष्ट साध्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय रुग्णालये व काही खासगी रुग्णालये यांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करून आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यात आले. जिल्ह्यातील 13 रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा क्षेत्रातील 12 कोर्सेससाठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी देण्यात आली.

००००



Featured post

Lakshvedhi