Wednesday, 6 April 2022


 

 केंद्रीय पुरातत्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या रखरखावाविषयीविधीमंडळात अहवाल सादर करावा

- डॉ. नीलम गोऱ्हे        

            नवी दिल्ली, दि. 6 : महाराष्ट्रातील एकवीरा देवी मंदीर, लेण्याद्री मंदिरासोबतच अन्य ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, जी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात त्यावर झालेल्या रखरखावाच्या खर्चाविषयी अहवाल विधीमंडळाच्या पटलावर पुरातत्व विभागाने सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

           डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, राज्यातील जी ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, स्मारके केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात. इच्छा असून देखील राज्यातील जनतेला तसेच राज्यशासनाला अशा स्थळांचे नविनीकरण, सौंदर्यीकरण, डागडुजी करता येत नाही. तसेच पुरातत्व विभागाकडूनही अनेक वर्षांपासून डागडूजी होत नसल्याची शंका डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा स्थळांची अधिकच दुरावस्था होत चाललेली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागांतर्गत येणा-या राज्यातील स्थळांमध्ये काय काम केले आहे. याविषयी केंद्रीय पुरातत्व विभागाने विधीमंडळात अहवाल सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. लोकसभा अध्यक्ष हे संबंधित विभागाला निर्देशित करतील अशी, अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी निगडित असणा-या धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणीभक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

            महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊलखुणा देशभर आढळतात. विशेषत्वाने मध्यप्रदेश, हरीयाणा, उत्तरप्रदेश या ठिकाणी उमटून दिसतात. अशा स्थानांवर येणा-या भाविकांची तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘भक्ती निवास’ बांधण्‍याचा संकल्प उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांच्या मार्गदर्शनात पुढील काळात या कामासंबधी आखणी केली जाईल अशी, माहितीही त्यांनी योवळी दिली.

आमदार अधिक प्रभावीपणे संसदीय आयुधांचा वापर करतील

            महाराष्ट्रातील जवळपास 100 आमदारांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले असून संसदीय आयुधांचा वापर आमदार अधिक प्रभावीपणे करतील, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

            लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आमदारांसाठी 5 आणि 6 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

            आपल्या मतदार क्षेत्रातील प्रश्न, समस्या प्रभावीपणे सदनात मांडण्यात यावे, तसेच संसदीय नियमावलीची माहितीची जाणीव व्हावी यासाठी या प्रशिक्ष‍ण शिबीराचा लाभ होईल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदारांकडून येणा-या सूचनेवरून भविष्यात विधीमंडळात देशातील उत्तम काम करणाऱ्या खासदारांची व्याख्याने आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            मंगळवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती डॉ गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

            आजच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, खासदार गिरीश बापट, अरविंद सावंत, वंदना चव्हाण, सत्यपाल सिंग यांची व्याख्याने आयोजित आहेत.

००००





 पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी

- उपमुख्यमंत्री अजित पवार.

• शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा.

• शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन.

            शिर्डी, दि.०६ : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

            शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांद्वारे अधिक वाढ करण्यात येईल. पोलीसांसाठी ५३५ चौरस फुटांच्या साडेसहा हजार सदनिका शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.

          पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसांनी करू नये, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी सांगितले.

             गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले. 

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी

            शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.

            यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६ हजार ८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने राज्य पोलिस राखीव दलामधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतला.

        कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे, असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

            या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलीस व १ पुरूष पोलीस अंमलदारास सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.

 जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन सहकार्य करणार.

-क्रीडा मंत्री सुनील केदार.

            मुंबई, दि.6 : राज्यातील जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन आणि क्रीडा विभागाचे नेहमी सहकार्य राहील,असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग, सागरी साहसी जलतरण प्रशिक्षण केंद्र, जुहू बीच, मुंबई, इंडियन डायव्हर अँड एक्सप्लोरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन वॉटर स्विमिंगचा प्रसार-प्रचार करण्याच्या दृष्टीने आयोजित सागरी साहशी जलतरण अभियानाचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

            क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यातील जलतरणपटूंनी हा एक धाडसी आगळा वेगळा उपक्रम राबविला. क्रीडा क्षेत्रात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. सहभागी सर्व जलतरणपटूंमध्ये आत्मविश्वास आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी हे 31 कि.मी. अंतर ते वेळेच्या आधी पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी इंडियन नेव्हीचे, जिलेट कोशी, मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी,क्रीडा विभागाचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी जलतरणपटूंचे पालक उपस्थित होते. या सागरी जलतरणाचे नेतृत्व नागपूरचे आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे यांनी केले. या देशातील सर्वात मोठे आणि पहिले सागरी जलतरण अभियान राज्याच्या क्रीडा विभाग, स्काऊट गाईड विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग तसेच मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात आले.

अभियानाविषयी अधिक माहिती

            गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी अशा अंदाजे 31 किलोमीटर अंतराच्या या अभियानाकरिता राज्यातील पन्नास जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील दहा-बारा वर्षे वयोगटापासून ते 60 वर्षे वयोगटापर्यंतच्या जलतरणपटूंचा अभियानामध्ये समावेश आहे. या अभियानामध्ये 3 पॅरास्विमर्सची देखील निवड करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातून 9 जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे.

             या अभियानाच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त समुद्र, स्वच्छ भारत तसेच ड्राऊनिंग प्रिव्हेन्शनचा देखील संदेश देण्यात येणार आहे.

000000


 




 


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

अभिनव पद्धतीने साजरी करणार.

- धनंजय मुंडे.

         · आजपासून दहा दिवस राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम"

         · अंमलबजावणी व नियंत्रणासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत.

            मुंबई, दि. 06 :- सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे नियोजन विभागाने केले असून, यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टीचे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे.

असा असेल सामाजिक समता कार्यक्रम...

            सामाजिक न्याय विभागाने दि. 06 एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक समता कार्यक्रम आयोजन करण्याबाबत दैनंदिन उपक्रमांचे शासन परिपत्रक जारी केले आहे.

            या परिपत्रकानुसार दि. 06 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हास्तरावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे.

            दि. 07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

            दि. 08 एप्रिल रोजी, जिल्हा व विभागस्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येतील.

            दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

            दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्यात येईल.

            दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

            दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.

            दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

            दि. 14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील.

            दि. 15 एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.

            दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तिंचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

         

 राज्यपालांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न

            मुंबई, दि. 6 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला.

            यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी.एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले शिवाचार्य व तंत्री तसेच हजारो भाविक उपस्थित होते.

            यावेळी राज्यपालांनी कार्तिकेय स्वामी, महागणपती तसेच मंदिरातील इतर देवीदेवतांचे दर्शन घेतले. राज्यपालांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            मुंबईतील तामिळ भाषिक लोकांनी स्थापन केलेला 'श्री सुब्रह्मण्य समाज' आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेतर्फे १९८० साली कला, वास्तुशास्त्र व संस्कृतीचा संगम असलेले 'तिरुचेंबूर मुरुगन मंदिर' बांधण्यात आले. दर बारा वर्षांनी मंदिरात महाकुंभाभिषेक केला जातो.

0000

Featured post

Lakshvedhi