Tuesday, 8 March 2022

 मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यावर भर

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

            मुंबई, दि. 7 : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत असून कंत्राटदार बदलणे, भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावणे अशा विविध स्तरावर काम करीत आहे. या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.

            विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. चव्हाण बोलत होते. 

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून यातील पनवेल ते वडखळ या ३८ किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विविध भागातील ८४ किलोमीटरपैकी ६३ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

            इंदापूर ते झराप या एकूण ३६६ किलोमीटर लांबीतील ३५५.२८० किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. रस्त्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या जलवाहिन्यांचे स्थानांतरण करण्यात येते तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी या कामाचे देयक महाराष्ट्र जीवन प्राधिकणाकडून प्रमाणित केल्यानंतरच अदा केले जाते, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.



 बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठविण्याची

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

· बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेणार.

            मुंबई, दि. 7 : बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असून बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठविण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.

            बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, श्रीमती नमिता मुंदडा आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर गृहमंत्री श्री. वळसे-पाटील बोलत होते. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कौटुंबिक जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार करण्यात आला, यात दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे, या प्रकरणातील जखमींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची चौकशी करु, तथ्य आढळले नाही तर त्यांना त्यातून वगळण्याची कार्यवाही केली जाईल. या प्रकरणात जशी स्पष्टता येईल तशी आणखी कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

            बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा विषय गंभीर असून आजपर्यंत ११९ कारवाया केल्या असून त्यात १४६ जणांना अटक केली आहे तर १ कोटी ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाळूचे अवैध उत्खनन हा संपूर्ण राज्याचा विषय असून वाळू माफियांवर निर्बंध आणण्यासाठी गृह विभाग गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.

            केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून आमदार श्रीमती मुंदडा यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही असे निदर्शनास आल्यास संबंधित दोषी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

००००

अमरावती प्रकरणाची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी.

- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

            मुंबई, दि. 7 : अमरावती येथील प्रकरणाची आणि आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून प्राप्त अहवालावर विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. अमरावती येथील घटनेच्या संदर्भात आपण स्वतः किंवा मुख्यमंत्री यांनी कोणतेही आदेश दिलेले नाहीत असेही गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या भारतीय दंड विधान ३०७ आणि ३५३ गुन्हा दाखल झाल्याचा विषय आमदार राणा यांनी विधानसभेत मांडला होता. यावर गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले की, अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्यात कुठलाही पुतळा बसवता येत नाही, हा राज्याचा नियम असून तो सगळीकडे पाळला जातो. या पुतळ्याची उंची इतकी लहान होती की, रस्त्यावर चालता चालता त्या पुतळ्याला कुणाचाही हात लागू शकत होता. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नियमाप्रमाणे पुतळा हटवला. त्यासाठी त्यांनी पोलिस सरंक्षण मागितले होते, ते त्यांना पुरवले. आयुक्तांनी नियमांप्रमाणे त्यांच्या अधिकारात कारवाई केली. ज्यादिवशी मनपा आयुक्तांवर शाई टाकण्यात आली, त्यादिवशी अमरावतीमध्ये असे वातावरण निर्माण झाले होते की, पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तरीसुद्धा जर आमदार रवी राणा त्यादिवशी दिल्लीत असताना त्यांच्यावर भादंवि ३०७ चा गुन्हा दाखल झाला असेल तर तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत दाखल झाला, याची चौकशी करणे आवश्यक ठरते त्यामुळे अपर पोलीस महासंचालकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

०००००

 जिल्हा परिषद शाळांच्या थकीत वीजबिलांसाठी निधी वितरित

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड.

            मुंबई, दि. ७ : राज्यातील १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांचे थकीत वीज बिल अदा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस ५ कोटी ८८ लाख ६३ हजार रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दोन हजार ६५७ जि. प. शाळांची एकूण तीन कोटी २० लाख ५९ हजार रकमेची वीज देयके अदा करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

            आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ टक्के सादील अनुदानाखालील उपलब्ध तरतुदीनुसार ५ कोटी ८८ लाख ६३ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून ४ जून २०२० च्या शासन निर्णयान्वये सादील अनुदानातून खर्च करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जि. प. प्राथमिक शाळांमधील इटंरनेट जोडणी देयक, विविध डिजिटल व संगणक साहित्य आणि त्यासोबतची उपकरणे यांची देखभाल व दुरूस्ती व तसेच वीज बिल भरण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ३४.५० कोटी इतके सादील अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यापैकी २२.५० कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या किरकोळ खर्चासाठी मंजूर करण्यात आला असून त्यातून वीज देयके अदा करण्यात येतील, असेही प्रा. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.



 बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्ड जमिनी चौकशी प्रकरणी एस.आय.टी.ची व्याप्ती वाढवणार

                              - गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि.7 : बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्री अपहार प्रकरणी एकूण 5 गुन्हे दाखल झाले असून या 5 गुन्ह्यांपैकी 3 गुन्ह्यात आय.पी.एस.अधिकारी श्री.कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            जमीन अपहारप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी अन्य आरोपी हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांना न्यायालयाकडून 8 मार्च 2022 पर्यंत अटक मनाई आदेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. तसेच या गुन्ह्यातील दोन उपजिल्हाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध करून घेतली जातील, तसेच गुन्ह्यांची व्याप्ती जास्त असेल तर एस.आय.टी.मध्ये आणखी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून जलद गतीने तपास करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

            याबाबत प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विनायक मेटे, अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.



 राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह;

शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 7 :- राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

            दि. ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

            यावर्षी महिला दिन सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषादेमार्फत राज्यस्तरावर ऑनलाईन/ ऑफलाईन आयोजित करावयाच्या कार्यक्रमामध्ये 8 मार्च रोजी ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुलींच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन होईल. 9 मार्च रोजी महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्रीमती श्रुती तांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येईल. 10 मार्च रोजी ‘घे भरारी’- करिअरच्या नवीन संधींबाबत मुरूड येथील प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर आर्थिक स्त्रोतांची माहिती देऊन मार्गदर्शन करतील. 11 मार्च रोजी महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती बाबत ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन करतील. तर 12 मार्च रोजी ‘माझी सखी, माझी सहचारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे श्रीमती विनया निंबाळकर व महेश निंबाळकर यांची मुलाखत आयोजित करण्यात येईल.

            याचप्रमाणे जिल्हा, तालुका आणि शाळास्तरावर वक्तृत्व स्पर्धा, अनुभव कथन, समुपदेशन, चर्चासत्र, महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट/ चित्रफितीच्या साहाय्याने अभिव्यक्ती तसेच जिल्ह्यातील प्रेरणादायी महिलेचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत.

            या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन #महिलादिन२०२२ #womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करून उपक्रमाशी संबंधित व्हीडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook, Instragram, Twitter) अपलोड करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी केले आहे.


०००००

 पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत

महिला कला महोत्सवाचे आयोजन.

            मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दि. ८ ते १२ मार्च या कालावधीत महिला कला महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

            पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत दरवर्षी ८ मार्चला महिला कला महोत्सवाचे आयोजन केले जात असते. महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे या महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात येते. यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एकूण २४ कार्यक्रम सादर होणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ८ मार्च रोजी होणार असून, या दिवशी मकरंद देशपांडे यांचे 'सर प्रेमाचं काय करायचं' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. काव्य, नाट्य, मुलाखती, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असून; रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

            हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पास देऊन प्रवेश मिळवता येईल. या महोत्सवाचे पास पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे कार्यालयीन वेळेत मिळतील. कोविडविषयक नियमांचे पालन करून कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

००००

महिला बहुविध प्रतिभासंपन्न; आगामी युग महिलांचे असेल

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

· स्वरा भास्कर, हुमा कुरेशी यांसह ३५ महिलांना पॉवरफुल वूमेन ऑफ द यिअर पुरस्कार प्रदान

            मुंबई, दि. 7 : महिलांना निसर्गतः बहुविध प्रतिभा लाभली आहे. आता जगात तसेच भारतात नव्या युगाचा उदय होत आहे. हे आगामी युग महिलांचे असेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे 'पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर' पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री स्वरा भास्कर, हुमा कुरेशी, मेघना घई - पुरी, पायल घोष, झारा यास्मिन, शिखा तलसानिया, अवंतिका खत्री, डॉ दुरु शाह यांसह ३५ महिलांना 'पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर' पुरस्कार देण्यात आले. यावेळी मिड-डे समुहाच्या राष्ट्रीय व्यवसाय विकास प्रमुख संगीता कबाडी व वरिष्ठ व्यवस्थापक राहुल शुक्ला उपस्थित होते.

            स्त्री ही शक्तीचे रूप असून या विश्वाचे नियंत्रण मातृशक्तीच करीत असते. विद्यापीठांमधील सर्वच दीक्षांत समारोहात आज मुलीच ९० टक्के सुवर्णपदके प्राप्त करीत असून भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असे राज्यपालांनी सांगितले.

            घरकाम करणाऱ्या महिलांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. या महिला ४ - ५ घरांना मदत करून स्वतःचे देखील घर सांभाळतात. या महिला म्हणजे स्त्रीशक्तीचे शांत रूप असल्याचे स्वरा भास्कर यांनी सांगितले व आपल्या यशाचे श्रेय आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना दिले. यावेळी हुमा कुरेशी यांनी सर्व महिलांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. संगीता कबाडी यांनी आभारप्रदर्शन केले.

            यावेळी डॉ दुरु शाह, दीपशिखा देशमुख, इराम आफताब फरीदी, अंजली रैना, मीना सेठी मोंडल, सुजाता ढोले, डॉ विद्युल्लता नाईक, वनिता भाटिया, प्रेरणा उप्पल, शिला ठक्कर, केतकी राणे, शिल्पा शिवराम शेट्टी, सीमा धुरी रणखांब, झरीन मनचंदा, आसमा सय्यद, आंचल जयधारा, प्रिया गुरुनानी, चंद्रिका शाह, गौरी भट्टाचार्य, डॉ मणिमेकलाई मोहन, अक्षता वर्मा, महेक पुरोहित, झैनाब शेख, स्मिता पुरोहित, नेहा कंधारी, ऍड मीनल खून, कोमल लालपुरीया, महेश धनावडे, संजीव ठक्कर व योगेश लाखनी यांचा सत्कार करण्यात आला. 

००००

Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year'

Swara Bhaskar, Huma Qureshi, among those felicitated.

            Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Powerful Women of the Year 2022' award to women achievers from various fields at Raj Bhavan Mumbai on the eve of International Women's Day on Monday (7 Mar)

            Actress and writer Swara Bhaskar, film stars Huma Qureshi, Meghna Ghai Puri, Payal Ghosh, Zaara Yesmin, Shikha Talsania, Avantika Khatri, Eram Aftab Faridi, Dr Duru Shah were among the 35 women achievers felicitated on the occasion.

            National Business Head of Mid-Day Sangeetha Kabadi and Sr General Manager Rahul Shukla were present on the dais. 

००००


 केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या

सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन.

            मुंबई, दि. 7 :- केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार' महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी असलेला आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणारा मानाचा पुरस्कार तीन महाराष्ट्रकन्यांना मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या लेकी महाराष्ट्राच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा पुढे नेत आहेत, हे या पुरस्कारातून पुन्हा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले आहे.                                  

००००००

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना

मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

            मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचे काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केले आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपले कर्तृत्वं सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचे शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील स्त्रीशक्तीचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील माता-भगिनींना, स्त्रीशक्तीला वंदन केले असून समाजनिर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच स्त्रीशक्तीचे महत्वं ओळखून त्यांना संधी देण्याचे काम केले. राज्यातील स्त्रीशक्तीनंही संधींचे सोनं करत बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिले. राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचे राज्य, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु करुन महिलांना स्त्रीशिक्षणाची दारे खुली करुन दिली. महाराणी ताराबाईंनी आपल्या शौर्यानं इतिहास घडवला, त्या इतिहासाने अनेकांना प्रेरणा दिली.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतरत्न लतादीदी त्यांच्या स्वरसामर्थ्यामुळे स्वरसम्राज्ञी ठरल्या. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्वं केले. तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी महिलांसाठी सैन्यदलांची दारे खुली केल्याने आज अनेक महिला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रानेही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्याने अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रिय झाल्या आहेत. उद्योगजगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचे योगदान महत्वाचे ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात माझ्या शासकीय गाडीचे सारथ्यं स्थानिक पोलिस दलातील तृप्तीताई मुळीक या पोलिस भगिनीनं केलं होतं. राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

०००००००



Featured post

Lakshvedhi