सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 2 March 2022
प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई, दि. 1 - मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी पणामुळे महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्री यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी श्री.डुबल आणि श्री.मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ या महिलेस उडी मारण्यापासून रोखल्याने अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.
0000
राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च रोजी
· राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
मुंबई, दि. 01 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
0000
Tuesday, 1 March 2022
जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत महत्वाची
-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 01 : आज जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
आचार्य तुलसी यांनी सन १९४९ मध्ये सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त 'शंखनाद अणुव्रताचा' हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन अणुव्रत समिती मुंबईतर्फे करण्यात आले होते.
यावेळी आचार्य महाश्रमण यांचे शिष्य मुनिश्री डॉ अभिजित कुमार, मुनिश्री जागृत कुमार, अणुव्रत विश्वभारतीचे अध्यक्ष संचय जैन, अणुव्रत समिती मुंबईच्या अध्यक्षा कंचन सोनी, समाजसेवक रविंद्र संघवी व राजकुमार चपलोट आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे प्रचंड नरसंहार झाला त्यावेळी आता विश्वशांतीसाठी ॲटम बॉम्ब नाही तर आत्मभान आवश्यक असल्याचे आचार्य तुलसी यांनी जगाला पटवुन दिले. या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना करता येईल असे अणुव्रत म्हणजे शांततेसाठी लघुसंकल्प करण्यास त्यांनी सांगितले होते. आज जगभर युद्धाची परिस्थिती उद्भवली असताना सर्वांनी शांततेच्या दिशेने लहानसाही प्रयत्न केला तर एक निरोगी समाज व सुखी जग निर्माण करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी 'उत्थान गीत' तसेच पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
मुनिश्री जागृत कुमार यांनी तणाव मुक्त जगण्याचे सूत्र सांगितले तर मुनी डॉ अभिजित कुमार यांनी संबोधन केले.
कंचन सोनी व संचय जैन यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार चपलोट यांनी सूत्रसंचालन केले तर वनिता बाफना यांनी आभार प्रदर्शन केले.
0000
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चा राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार ललित गांधी यांना*
-----------------------------------
*केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान*
-----------------------------------
नवी दिल्ली ः भारतातील 8 कोटी व्यापार्यांची शिखर संस्था असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या संस्थेचा *राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर के अध्यक्ष ललित गांधी यांना प्रदान करण्यात आला.
कॉन्फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक प्रसंगी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्या हस्ते शानदार समारोहात पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी कॉन्फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, सौ. जया गांधी, कु. मुक्ति गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यापारी, उद्योजकांची संघटनात्मक बांधणी, व्यापारी उद्योजकांच्या संरक्षणासाठी व न्याय हक्कासाठी विविध लढ्यांचे व आंदोलनाचे केलेले यशस्वी नेतृत्व, स्थानिक पातळीपासुन राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत व्यापार्यांच्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष व पाठपुरावा या क्षेत्रातील गेल्या 35 वर्षातील केलेले उल्लेखनीय कार्य, विशेषतः कोरोना काळात लॉकडाउन मधील व्यापार्यांच्या हक्कासाठी दिलेला आक्रमक लढा याची दखल घेउन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी नमुद केले.
सदर समारंभाप्रसंगी कॅट चे राष्ट्रीय चेअरमन महेंद्र शहा,वरिष्ठ उपाध्यक्ष बृजमोहन अगरवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, कॅट चे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, कार्याध्यक्ष दिलीप कुंभोजकर,सचिन निवंगुणे यांच्यासह देशभरातील सर्व राज्यांचे प्रमुख व व्यापारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना ललित गांधी यांनी कॉन्फेडरेशनने या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून हा पुरस्कार हा सर्व सहकार्यांच्या सामुहीक प्रयत्नांमुळे मिळाला असल्याचे त्यांच्या वतीने स्विकारत असल्याचे नमुद करून देशभरातील व्यापारी, उद्योजकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे सांगितले व आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यापारी व उद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत राहु असे अभिवचन दिले.
युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 72 विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल
· महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले.
नवी दिल्ली, दि. 28 : युध्दजन्य युक्रेन देशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण ७२ विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.
सध्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवार मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास १२५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
थोडक्यात तपशील
एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी १८ आणि १२ विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी प्रत्येकी १० आणि ४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले.
महाराष्ट्र सदनाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे,यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कक्षाद्वारे गेल्या दोन दिवसात ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.
सहकार्य कक्षामध्ये एकूण २५ अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत
महाराष्ट्र सदनाद्वारे दिल्ली विमानतळावर स्थापन सहकार्य कक्षात ५ अधिकारी- कर्मचारी तर ५ वाहन चालक कार्यरत आहेत. विमानतळाहून महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी कार्यरत आहेत.
सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य...
दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे.विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत ४६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...