Sunday, 27 February 2022

 







Mayaechi marathi

 



 जनसामान्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी

परराष्ट्र मंत्रालयाने ‘मिशन मोडने’ काम करावे

-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

        मुंबई, दि. 27 : परराष्ट्र व्यवहार देशाकरिता अतिशय महत्वाचा विभाग असून करोनाच्या कठीण काळात या विभागाने अतिशय कुशलतेने काम केले. सध्या युक्रेन येथे उद्भवलेल्या परिस्थितीत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारतीय लोकांना सुरक्षित आणण्यासाठी चांगले काम करीत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्यामुळे देशाची प्रतिमा तयार होते असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने नागरिक तसेच देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, प्रवासी संरक्षक विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय शाखा सचिवालयातर्फे एक आठवड्याच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता व बक्षीस समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आज रविवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमाला क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ राजेश गवांडे, प्रवासी संरक्षक अधिकारी राहुल बऱ्हाट, भारतीय संस्कृती संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी व परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रित उपस्थित होते.

            देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई येथे अनेक राष्ट्रप्रमुख, विदेशातील प्रांतीय मुख्यमंत्री, संसद सदस्य, राजदूत व उद्योजक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईतील परराष्ट्र मंत्रालय विभाग दिल्लीपेक्षाही अधिक सक्रिय आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयातील लोक किती तत्परतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतात यावर देखील देशाच्या परराष्ट्र नीतीचे यश अवलंबून असते असे राज्यपालांनी सांगितले.     

            सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सामान्य नागरिकांना त्वरित प्रतिसाद देणारी प्रणाली विकसित केली होती असे सांगून या प्रणालीच्याही पुढे जाऊन परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा दिली तर तो विभाग आदर्श विभाग म्हणून प्रस्थापित होईल असे राज्यपालांनी सांगितले.  

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच काव्य संमेलनातील सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

000

Governor Koshyari attends Azadi Ka Amrit Mahotsav

celebrations organised by MEA

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the concluding programme and awards ceremony of the weeklong celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav organised by the regional offices of Ministry of External Affairs in Mumbai on Sunday (27 Feb).

      The celebration involving cultural, social and sports event was organised jointly by the Regional Passport Office, Protector of Emigrants, Indian Council of Cultural Relations and MEA Branch Secretariat.

       Head of MEA Secretariat Mumbai and Regional Passport officer Dr Rajesh Gawande, Protector of Immigrants Rahul Barhat and Regional Director of ICCR Renu Prithiani were present.

      The Governor distributed prizes and felicitated poets participating in the Kavya Sammelan organised on the occasion.

000



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा

अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या पुण्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी.

            मुंबई, दि. 26- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 1098 उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील 666 पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 1098 परीक्षा केंद्रांवर 3 लाख 62 हजार 319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पाहणी केली. 


             दि. 23 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना श्री. निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती.


            भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’ मध्ये - श्री. निंबाळकर


राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.  


            स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग 'ॲक्शन मोड'मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.


 


00000


 


 


 


 


 

 राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासू क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर उपक्रम                                                                                    - क्रीडा मंत्री सुनील केदार

            मुंबई, दि.26: देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (सुजीसी) मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरु होत असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            वानखेडे स्टेडियम येथे माध्यमांशी संवाद साधाताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, भारताचे माजी डावखरे फिरकी पटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल यांची उपस्थिती होती.

            श्री. केदार म्हणाले, राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे जगातील सर्वोउत्कृष्ट विद्यापीठ करण्याचा मानस आहे. क्रीडा विद्यापीठातील सुरु होणारा अभ्यासक्रम राज्यासाठी नवीन आहे. यामध्ये उणिवा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनी आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी सूचना केल्यास त्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशात विविध भागात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयात क्रीडा अभ्यासक्रमाचे कोर्सेस सुरु आहेत. त्यांनाही त्या कोर्सेससाठी विद्यापीठामुळे मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            राज्यात गेल्या दिड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा झाली त्याच वेळी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार होता, परंतू पूर्ण जगावरच कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने अभ्यासक्रम सुरु करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी कमी होत असल्याने विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्याचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित "स्पोर्ट्स-एड" क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल असेही श्री. केदार यांनी सांगितले.

            राज्यातील दोन्ही सभागृहात विद्यापीठाचा निर्णय एकमताने मंजूर झाला त्याबद्दल सर्व लोक प्रतिनिधींचे श्री. केदार यांनी यावेळी अभार मानले. भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी श्री. केदार यांनी 'यूजीसी'च्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आहे. "बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेंट' या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि 10 अब्ज डॉलर मूल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, यापूर्वी वित्तीय सेवा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत ज्या प्रमाणे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले, त्याचप्रमाणे क्रीडा प्रतिभा समृद्ध करणारे एक अग्रणी राज्य म्हणून ते उदयास येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

            विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापन यांत कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये पुनर्कल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा शिक्षणात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील क्रीडा व्यावसायिक तयार करणे हे आमचे ध्येय तयार झाले आहे. यापुढे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये 'आयआयटी' आणि 'आयआयएम या संस्थांचे देखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरुन एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

            क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, "भारतातील क्रीडा परिसंस्थेसाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. देशातील तरुणांच्या करिअरला चालना देणाऱ्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा हा विषयही महत्त्वाचा ठरेल. अर्थात, या तरुणांना आपण क्रीडा शास्त्रात व्यावसायिक पद्धतीने घडविले पाहिजे. आमचे उद्योग तज्ज्ञ त्यांना क्रीडा व्यावसायिक बनण्यात मदत करतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

00000


 


 



 युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले

विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार

          मुंबई, दि, 26- एअर इंडियाचे AI - 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले. 

          यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.

    विद्यार्थ्यांसाठी विमानतळावर चहापान व बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

      युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

          युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्याची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच हॉटॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

      मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्याचा समावेश आहे.मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.

००००




 

Featured post

Lakshvedhi