Saturday, 19 February 2022

 शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायाला अभिवादन

मुंबई, दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार आदी उपस्थित होते.

सनई चौघडा वादकांना शाबासकी

शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन चौथऱ्यावरून खाली येताना राज्यपालांनी सनई चौघडे वाजविणाऱ्या कलाकारांजवळ थांबून उत्तम वादन केल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली व बक्षीस दिले. 

कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले होते. 

अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. यावेळी संगीत कला अकादमीतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, खा. अरविंद जाधव, किसन जाधव आदी उपस्थित होते. 

 Governor garlands statue of Shivaji Maharaj on Shiv Jayant

 Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari garlanded the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Chhatrapati Shivaji Maharaj Park in Mumbai on the occasion of Shiv Jayanti on Saturday (19th Feb).

 Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh, Mayor of Mumbai Kishori Pednekar, Member of Parliament Arvind Sawant, Deputy Mayor Adv Suhas Wadkar, former Mayor Shraddha Jadhav, Chairman of Shri Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti Kisan Jadhav, Additional Municipal Commissioner Dr Sanjeev Kumar and citizens were present.

 The Governor later participated in the Shiv Jayanti celebrations organised by the Brihanmumbai Municipal Corporation at Krida Bhavan and listened to the patriotic songs on the life of Chhatrapati Shivaji Maharaj presented by the Sangeet Kala Academy of BMC


शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरe

शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

            मुंबई, दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

            अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकीयांकडून तर काही परकीयांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. 

            महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते , त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजा दक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत. 

            शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते. 

            राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहन मंत्री

अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन

            मुंबई, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी परिवहन मंत्री परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी याप्रसंगी सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000


 



 पंतप्रधानांच्या हस्ते पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे

 लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ

ठाणे आणि दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे

अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती - पंतप्रधान

‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना

            ठाणे, दि. 18 (जिमाका) : ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            ठाणे रेल्वे स्थानक येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, मनोज कोटक, आमदार संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, महापौर नरेश म्हस्के, रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.के.त्रिपाठी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मध्य रेल्वेमार्गावर 36 नवीन लोकल

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन पंतप्रधान श्री.मोदी म्हणाले, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गीकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गीका असतील. या दोन्ही मार्गीकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून 36 नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

             अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गीकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

आगामी वर्षभरात 400 नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करणार

            मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे 400 कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतूकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात 400 नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

‘दिवा’स्वप्न पूर्ण झाले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरुन सुरुवातीला ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गीकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दळणवळणाच्या विविध सुविधा ‘विकास वाहिन्या’

            रस्ते, रेल्वे, मेट्रो, जल वाहतूक यांच जाळ जेवढं घट्ट तेवढी विकासाला गती मिळते. मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे देशभर जाळे विणले जाते असे सांगतानाच दळणवळणाच्या या विविध सुविधा शरीरातील रक्त वाहिन्यांप्रमाणे ‘विकास वाहिन्या’ असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गीकेच्या कामासाठी केलेला पाठपुरावा आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास कामांचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ब्रिटिशांनी मुंबई-ठाणे रेल्वे सुरु केली होती. त्या काळी या रेल्वे मधून प्रवास करताना लोक कसे घाबरायचे याबाबतची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

वर्षभरात साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ- केंद्रीय रेल्वे मंत्री

            पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेमुळे एका वर्षात सुमारे साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ होईल असे रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे सेवेचे उन्नतीकरण करतानाच नवीन स्थानकांचे निर्माण देखील केले जात आहे. हे नवीन स्थानक देशातील शहरांचे आर्थिक जीवन वाहिनी बनत असल्याची भावना रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे सेवांचा विस्तार करताना देशभरातील सुमारे दीड लाख टपाल कार्यालय आणि रेल्वे सेवा यांना एकमेकांशी जोडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी तत्कालीन दिवगंत खासदार रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

165 वर्ष जुन्या ठाणे रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास करावा- मंत्री एकनाथ शिंदे

            पालकमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले, नव्या मार्गीकांमुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून ठाणे, दिवा, कल्याण या गर्दीच्या स्थानकांना त्यांचा फायदा होईल. ठाणे रेल्वे स्थानक 165 वर्ष जुने असून त्याचे पुर्नविकास होणे गरजेचे असल्याचे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. कळवा-ऐरोली उन्नतमार्ग प्रकल्पाचे काम करताना त्या भागातील नागरिक विस्थापित होणार नाहीत याची दक्षता घेतानाच केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही श्री.शिंदे यांनी दिली.

            गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेने राज्य शासनाला सहकार्य करत एसआरएच्या माध्यमातून विस्थापितांसाठी गृहनिर्माण करण्याची मागणी श्री.आव्हाड यांनी यावेळी केली.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री.पाटील यांनी नव्या मार्गीकेमुळे केवळ रेल्वे सेवांचीच नव्हे तर मुंबई महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ.शिंदे, श्री.विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांनी आभार मानले.

0000



 

Friday, 18 February 2022

Turisum

 निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबत

एमटीडीसीमार्फत दिवेआगर येथे कार्यशाळा

            मुंबई, दि. 18 :महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) दिवेआगर येथे 20 व 21 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचावी जावी या उद्देशाने येथे सहभागी होणाऱ्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

          महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण या योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते.

          पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुणबी समाज हॉल, दिवेआगर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेदरम्यान महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे हे या योजनांबाबत सादरीकरण करतील. तसेच महामंडळाच्या स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग संस्था व भविष्यातील जल पर्यटन प्रकल्प आदींबाबतचीही माहिती देतील.

          सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 1 हजार 485 जणांनी निवास व न्याहारी योजनेचा तसेच 144 जणांनी महाभ्रमण योजनेचा लाभ घेतला आहे. व्यावसायिक पात्रता प्रस्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिकांसाठी महामंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होत असून कमीत कमी गुंतवणुकीसह उत्पन्न कसे वाढवता येईल, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीमार्फत कळविण्यात आले आहे.

००००


 


 


 

 बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना

ठाणे जिल्ह्यात वेहलोळी वगळता अन्यत्र कुठेही

बर्ड फ्लूची लागण नाही पशुसंवर्धन आयुक्तालयाची माहिती

            मुंबई, दि. १८ : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली येथे बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील १ किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

            ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये ३०० कुक्कुट पक्षी आणि ९ बदकांमध्ये मरतुक आढळून आली आहे. नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्यांचे तपासणी निष्कर्ष १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून, नमूद ठिकाणावर एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच५एन१ या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आले असल्याचे केंद्र शासनाने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिकृतरित्या कळविले आहे. पशुरोग अन्वेषण विभागाचे पथक शहापूर येथील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेले ठिकाण "संसर्गग्रस्त क्षेत्र"घोषीत

            या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी या क्षेत्रास "संसर्गग्रस्त क्षेत्र" म्हणून घोषीत केले असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार वेहलोळी या ठिकाणच्या बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून पथकाच्या देखरेखीखाली २३ हजार ४२८ कुक्कुट पक्षी, १ हजार ६०३ अंडी, ३ हजार ८०० किलो खाद्य आणि १०० किलो शेल ग्रीट नष्ट करण्यात आले आहेत. या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्व जिल्ह्यांमधील क्षेत्रिय यंत्रणांना आवश्यक सतर्कता बाळगण्याचे व चौफेर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दुरध्वनी

क्रमांक १८००२३३०४१८ तसेच कॉल सेंटर क्र.१९६२

            या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मरतुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मरतुक झाल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर क्र. १९६२ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

            मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४ (१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.

अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर

३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय

            बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यात दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतू अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

००००




 


 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा-कार्यशाळा सुरू करा

- धनंजय mundhe

महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व अन्य ठिकाणी

जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू करण्याचे आदेश

            मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तसेच अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या दि. 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

            राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा व कार्यशाळा चालवल्या जातात. या शाळांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे कोविड संसर्गाच्या काळात या शाळा बंद होत्या, आता एक मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.

0000



 



 मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना

 यंत्रणांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी

'मुंबई इन ट्रान्झिट' कार्यशाळेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

            मुंबई, दि. 17 : सामान्य माणसाच्या जीवनमानात सुलभता यावी यासाठी एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा विकास करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी, अशा सूचना पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

            बृहन्मुंबई महानगरपालिका, सामान्य नागरिक, नियोजक, तज्ज्ञ, बेस्ट उपक्रम यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधांची माहिती आणि फायदे या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणातर्फे 'मुंबई इन ट्रान्झिट' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एम एम आर डी ए चे सहआयुक्त राहुल कर्डिले यांचेसह मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. 

            मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांशी सकारात्मक बदलाबाबत सातत्याने संवाद साधला जाईल, जेणेकरून सामान्य मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            'मुंबई इन ट्रान्झिट' या कार्यशाळेत मेट्रो लाईन २ ‘अ’ आणि ७ चा पश्चिम उपनगरांवर होणारा परिणाम, बहुवाहतूक एकात्मिकरण, अंतिम गंतव्यस्थान जोडणी, एकात्मिक तिकिटीकरण प्रणाली आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

            मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्गाचा सुमारे ३३७.१ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत आराखडा तयार केला आहे, त्याची नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीस मेट्रो बृहत आराखड्यामधील मेट्रो मार्ग-१ (वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर) या ११.८० कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. मेट्रो २ ‘अ’ आणि ७ चे काम पुर्णत्वाकडे असून, लवकरच टप्प्या-टप्प्याने खुले करण्याचे नियोजन आहे. तसेच मेट्रो मार्ग २ ‘ब’ ४, ४ ‘अ’, ५, ६, ७अ आणि ९ चे बांधकाम सुरु आहे. मेट्रो मार्ग १०, ११, १२ ची प्रत्यक्ष अंमलबजावणीची कामे लवकरच सुरु होणे अपेक्षित आहेत. मेट्रो मार्ग ८, १३ व १४ चे नियोजन प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली.मेट्रो २ ‘अ’ आणि ७ लवकरच खुली करण्याचे नियोजन असल्याने या मार्गिकांची माहिती मुंबईकरांना व्हावी या दृष्टीने प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

००००



Featured post

Lakshvedhi