Thursday, 10 February 2022

 *एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली.... आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे. परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.*

*🙏माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.*

*🤞लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.*

*👍काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.*

*🤞जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.*

*🙏त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं.. बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.*

*🤞संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.*

*माणूस म्हणाला कां? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.*

*👍लक्ष्यात ठेवा......*

 *☝️भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं. ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...*   

        🙏🌹🙏

Wednesday, 9 February 2022

 चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता                            

            यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील पथसंचलनात ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ होता. राज्याच्यावतीने दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी. सन 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि 12 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे.

            यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीद्वारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून, महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासातही सुवर्ण अक्षराने आपली अमिट छाप सोडली आहे. 

असा होता महाराष्ट्राचा ‘जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथ

            चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोट्या आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैवविविधता दर्शविण्यात आली. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरली. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांची मने जिंकली होती.

‘मावज’ची ऑनलाईन मोहीम

            महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांच्याद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक 23 टक्के मते मिळाली होती.     

आतापर्यंत महाराष्ट्राच्या 12 चित्ररथांना पुरस्कार

            महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन, संत-वारी परंपरा आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

            वर्ष 1981 आणि 2018 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रात पोळा या सणाला विशेष महत्व आहे ‘बैलपोळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारीत वर्ष 1983 च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आले होते. वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथाला, वर्ष 1974 ला फळाचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष 1995 मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला वर्ष 2015 मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.

            महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामात कशा प्रकारे भाग घेतला होता यावर आधारीत वर्ष 1986 च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले. वर्ष 2009 मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणाऱ्या चित्ररथाने दुसरे पारितोषिक पटकाविले. तर वर्ष 2007 मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरा पुरस्कार मिळाला. वर्ष 2017 मध्ये लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित ‘बाळ गंगाधर टिळक’ या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळालेला होता.

राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन चित्ररथातून दिसते

            महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘भारत छोडो आंदोलन’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.

            राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यामध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले 1974 च्या चित्ररथामध्ये याच उद्योगधंद्यांचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे 1978 मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष 1979 मध्ये ‘बाल विकास’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.

            महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून 1980 ‘ महाराष्ट्रातील सण ’ असा चित्ररथ साकारण्यात आला. सन 1982 मध्ये राज्यातील समृद्ध ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली.

                                    लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर 4 वेळा चित्ररथ

            भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारीत चित्ररथ राजपथावर वेगवेगळ्या विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन 1984 आणि नंतर सन 2017 मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ होता.

            वर्ष 1986 हे स्वातंत्र्याच्या चाळीशी चे वर्ष होते, या निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन 1990 मध्ये पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष 1991 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्षानिमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य’ असा चित्ररथ सण 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.

‘हापूस’ आंबा

            आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सन 1994 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या 125 व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष 1996 ला ‘बापु स्मृती’ असा चित्ररथ बनविला. वर्ष 1997 ला चित्रपट सृष्टीने शंभरी पूर्ण केली होती. याची आठवण म्हणुन ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष ’ अशा संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.

            वर्ष 1996 मध्ये ‘महिला व बालविकास ’ अशा महत्वपूर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष 1999 ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी ’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित 2001 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला ’ अशी संकल्पना घेऊन 2002 ला चित्ररथ दर्शविण्यात आला. सण 2003 मध्ये ‘आदिवासी वारली चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ आकारण्यात आला.

‘मुंबईचा डबेवाला’

            महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अजिंठा लेणी यावर आधारित सण 2004 ला ‘अजिंठा लेणींमधील काही लेणींची भीत्तीचित्रे चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ सण 2006 मध्ये साकारण्यात आला. राज्यामध्ये भरणारी महत्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष 2007 मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे 2009 ला ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष 2010 ला जगाचे लक्ष वेधणारा ‘ मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’

            महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर चित्ररथ 2011 मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष 2012 मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण 2014 मध्ये कोकणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपूर्ण सण ‘ नारळी पोर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 2015 मध्ये राज्याची शतकांची परंपरा ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सन 2019 मध्ये महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त ‘भारत छोडो

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अद्ययावत संकेतस्थळ

- विजय वडेट्टीवार

      इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

            मुंबई, दि. 9 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल, जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

            सिंहगड या निवासस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, सहसचिव देवाप्पा गावडे, उपसचिव कैलास साळुंखे, सिद्धार्थ झाल्टे, कक्षाधिकारी किशोर फुलझुले, संकेतस्थळ निर्मितीचे वरिष्ठ सल्लागार देविदास सुसे, विजयसिंह राजपूत, प्रल्हाद अनलम, साक्षी गोराड, सिल्वर टेक्नॉलॉजीचे शुभम राणे यावेळी उपस्थित होते.

           मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळामुळे जनतेला घरबसल्या सर्व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. हे संकेतस्थळ मराठी व इंग्रजी दोन्ही भाषातून आहे. https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en असे या संकेतस्थळाचे नाव आहे. या संकेतस्थळावरील माहिती विद्यार्थी तसेच जनतेला अत्यंत उपयुक्त अशी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागानेही नव्याने या विभागाचे होणाऱ्या निर्णयांची व तसेच उपक्रमांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करावी, जेणेकरून जनतेला याची माहिती मिळेल.


                                                

 राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या

प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 8 : राज्याचे सुधारीत महिला धोरण 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने जाहीर करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्याची इंग्रजी भाषेतील प्रत महिला व बालविकास आयुक्तालयाच्या www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून या मसुद्याची मराठी भाषेतील प्रत देखील दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी याच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, राज्याच्या सुधारीत महिला धोरणाच्या या प्रारुप मसुद्यांबाबतचे आपले अभिप्राय महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या mahilavikas2021@gmail.com या ईमेलवर दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत, असे महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


------

Jagate roho


 

 रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या

कायम पुनर्वसनाकरिता निधी मंजूर

- आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. ८ : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

        मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, दि. २२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) ही गावे बाधीत झाली होती तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरिता भुसंपादन तसेच नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

   त्याअंतर्गत महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये भुसंपादन करण्यासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, मौजे केवनाळे मध्ये भुसंपादन करण्यासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भुसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे असे एकूण १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता

२५ लाख ७९ हजार १९२ रूपये निधीची तरतूद

            २२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने मान्यता दिली असल्याने जिल्हाधिकारी, रायगड यांनी प्रस्तावित केल्यानुसार कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना करणे तसेच रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी आवश्यक एकूण रु. ५५ लाख ५८ हजार ३८४ रूपये इतक्या निधीपैकी ५०% म्हणजे एकूण रु. २५ लाख ७९ हजार १९२/- इतका निधी शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचाही दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमीत केलेला आहे.


****

 अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांना

अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ८ : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमधून अनुदानाकरीता पात्र संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आयटीआय व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांनी १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी या योजनेमधून अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव पाठविण्याबाबची कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

Featured post

Lakshvedhi