Saturday, 1 January 2022

 अजब कोकणातील गजब चालीरीती!!! 


कोकणातील काही चमत्कारिक चालीरीतींचा हा अद्भुत मागोवा......

 *मालवण-कुडाळ* रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ *कासार टाका* नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे *नवस* बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची *श्रद्धा* आहे. नवस फेडायचा असेल तर *कोंबडा, दारू व सिगारेट* यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला देण्याची प्रथा आहे. कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडया विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यात *दाभील* नावाचे एक गाव आहे. या गावात एकही *विहीर नाही*. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही. परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडात *सात (बावी) विहिरी* आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणीच साऱ्या गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

*मातोंड* हे एकही *चहाचे दुकान* नसलेले गाव. येथील जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात *दारू* प्यायला बंदी. पण डोंगरात भरणारी *घोडेमुखची जत्रा* हा देव ब्राह्मण असून त्याला *शुद्ध शाकाहारी नैवेद्य* दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र *कोंबडय़ाचा नैवेद्य* द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला *कोंब्याची जत्रा* म्हणतात.

*देवगड* तालुक्यातील *नारिंग्रे* गावात कोणीही *कोंबडी* पाळीत नाहीत. अगर *बाहेरून* आणून *खाऊ* शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर *म्हापण* गावात *येसू आकाच्या* देवळात नवस फेडायचा असेल तर *सुक्या बांगडयाची चटणी* आणि *नाचण्याची भाकरी* असा अस्सल *मालवणी* बेत करावा लागतो.

*उभादांडा* येथे *मानसीचा चाळा* नावाचे एक *जागृत स्थळ* आहे. तिथे *नवस* फेडायचा असेल तर *खेकड्यांची माळ* आणि *गॅसची बत्ती* देतात. या चाळ्याच्या जत्रेला *बत्तेची जत्रा* म्हणतात.

*परुळे* गावच्या *येतोबाच्या* देवळात म्हणे, भिंतीला *लोखंडी खंजीर* चिकटतो. या उत्सवाला *बाक उत्सव* म्हणतात तर *आरवली* गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा *नवस* फेडण्यासाठी *सोनकेळीचा घड* आणि *चामडयाची चप्पल* भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली ही चप्पले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चप्पले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील *पेंडुर* गावचे *मसणे-परब* लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या *बोहल्यावर* उभे राहतात. याच तालुक्यातील *कोईल* गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेवर *गणपती* प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर *गणपतीचे कॅलेंडरसुद्धा* लावीत नाहीत. 

*कणकवली* तालुक्यातील *कुर्ली* गावचे *पाटील* घराण्यातले लोक *तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ* घालतात. तर *वालावल* गावातील एकही माणूस *पंढरपूरला* जात नाही.

फोंडाघाट येथील *वाघोबाचे मंदिर* हे समस्त *अनिष्ट* शक्तींना रोखून धरणारे *शक्तिस्थळ* आहे असे मानतात. इथले मंदिर कोंबडा आरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा *एकचक्रानगरी* म्हणून उल्लेख आहे ते गाव *वैभववाडी* तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आहे. इथे मोठमोठ्या *गुहा* असून त्यात *गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य* होते असे सांगितले जाते. दगडात *कोरलेला महाल* आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त *पलंग* आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात *प्रशस्त गुहा* आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर *पाण्याचे साठेही* आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला *राकसमाळ* असेही म्हणतात. 

*कोकणातील अशा असंख्य ठिकाणच्या चालीरीती व गूढता समजून घेवून अश्या अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!!! 

Mahesh Said यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार!!! 

फोटो सोर्स इंटरनेट!

Friday, 31 December 2021

 कपड्यावरील दरवाढ स्थगितीबद्दल सरकारचे आभार,चपलाकडे लक्ष देण्याची विनंती : ललित गांधी

-------------------------------

जीएसटी कौन्सिलने कपडे व फूटवेअर वरील पाच टक्के चा जीएसटी एक जानेवारी पासून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयामुळे देशभरातल्या कापड व फुटवेअर व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

31 डिसेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कपड्यावरील दरवाढ स्थगित ठेवण्याचा निर्णय केल्याबद्दल 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' चे अध्यक्ष ललित गांधी यांनी जीएसटी कौन्सिलला धन्यवाद दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे केंद्रीय अर्थमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासह जीएसटी कौन्सिल च्या देशातील सर्व राज्यांच्या सदस्य अर्थमंत्र्यांना यासंबंधी निवेदन दिले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन ही स्थगिती मिळवून दिल्याबद्दल गांधी यांनी पियुष गोयल यांचे विशेष आभार मानले.

मात्र त्याचबरोबर फुटवेअर वरील दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार असल्याने हा निर्णय पूर्णपणे न घेतल्याबद्दल ललित गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 46 व्या बैठकीमध्ये वस्त्र उद्योगावरील दरवाढ पुढे ढकलली मात्र फुटवेअर च्या दरवाढीबद्दल चर्चाही झाली नाही. *वस्त्रोद्योगातील दरवाढीचा प्रस्ताव जीएसटी च्या दर पुनर्रचना समितीकडे अभ्यासासाठी पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या समितीने फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल द्यावयाचा आहे.*

जीएसटी कौन्सिलने कपड्यावरील दरवाढ पुढे ढकलली, ही गोष्ट जरी स्वागतार्ह असली तरी ही दरवाढ रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ललित गांधी यांनी वस्त्रोद्योग व फुटवेअर या दोन्ही वरील दरवाढ रद्द करावी अशी आग्रही मागणी केली असून, 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' च्या वतीने यासाठी पुन्हा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

Thanks and Regards,

Lalit Gandhi | President

Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA)

Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra | Tel: +91 22 6739 5811 | Fax: 2285 5861 

Nashik Branch - 201, Sarda Sankul, M. G. Road, Nashik 422001, Maharashtra | Phone 0253-2577704 | Mobile: 9225619187 | Email: vini@maccia.org.in | Follow us on: Facebook & Twitter

 समग्र शिक्षा योजनेशी samagrashiksha.org या संकेतस्थळाचा संबंध नाही


· महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा खुलासा

            मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी व समग्र शिक्षा योजनेशी https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा कोणताही संबंध नाही, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.

           https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment Teacher, SSA Lab Technician, SSA Computer Teacher. Samagra Shiksha Abhiyan Recruitment Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ शासनाचे नाही. तसेच या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी कोणताही संबंध नाही. तथापि, या भरती प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील जाहिरातीमुळे उमेदवारांची दिशाभूल/ फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृत योजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत होती.

           सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनाच्या एकत्रिकीकरणातून दि. ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन ३१/०३/२०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान या योजनेची वेगळी अंमलबजावणी राज्यात सुरू नाही, असेही यासंदर्भातील पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००



 मी आणी माझे बॉस दारू पिऊन गाडीने घरी जात होतो.

तेव्हा मी ओरडलो, सर, समोर भिंत बघा. भिंत आहे, भिंत, भिंत बघा...  

आणि धम्म..

आम्ही भिंतीवर जोरात आपटलो. 

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी सरांना विचारलं, मी ओरडून ओरडून सांगत होतो भिंत आहे, भिंत आहे, ऐकलं की नाही तुम्ही ?

सर बोलले, ऐकून काय केलं असतं बेवड्या...

गाडी तर तू चालवत होतास.

🤨🤓😃😃

 *Drive Safely*

 *Believe (विश्वास) आणि Trust (विश्वास)*


दोन्ही शब्दांचा अर्थ "विश्वासच" आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.

जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या. तोंड फाडून कौतुक केले.

तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले. 

तो डोंबारी सगळ्यांना उद्देशुन म्हणाला 

"मला हे पून्हा एकदा करावसं वाटतं. तूम्हाला विश्वास वाटतो का मी हे पून्हा करू शकेन?"

सगळी माणसं एक आवाजात म्हणाली

"हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस."

डोंबारी म्हणाला "तूम्हाला विश्वास आहे मी हे करू शकेन?"

पुन्हा सगळे ओरडले "हो हो आम्हाला विश्वास आहे तू पून्हा हे नक्कीच करू शकशील."

"तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?"

"हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील."


डोंबारी म्हणाला "ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या मी त्याला खांद्यावर घेऊन मी या केबल वरून चालतो."

जमावा मधे एकदम शांतता पसरली.

सगळे चिडीचूप झाले.

डोंबारी म्हणाला "काय झाले. घाबरलात का? आताच तर तूम्ही म्हणालात की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?"


*तात्पर्य-* जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा *Belief* आहे.

*Trust* नाही.

तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे,

परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.

*You only belive in God, But you don't trust him.*

परमेश्वरावर विश्वास असेल तर

चिंता आणि ताण- तणाव कशाला हवेत. त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार? परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो मला नवीन करकरीत कोरा दिवस देतो माझ्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी. माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला माझा परमेश्वर माझ्या सोबत असतोच आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

🙏🏻

 समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया,

आव्हानांवर मात करूया 

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नववर्षाच्या शुभेच्छा

· गर्दी टाळण्याचे, आरोग्यदायी संकल्पांचेही आवाहन

          मुंबई, दि. 31 : थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवे. कितीही आव्हाने येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

          नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला केले आहे.

          मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता- म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हीच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हाने येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.

0000



 इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस

31 मार्चपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. 30 : इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूट ची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दि. 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक असतील, असेही यासंदर्भातील शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

            राज्याने 23 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून या धोरणामध्ये विविध प्रकारची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये त्वरीत नोंदणी सूट या प्रोत्साहनाचा समावेश आहे. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून परिचालित होणारी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीमधून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

            इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित असलेले विविध विभाग व यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आतापर्यंत अपेक्षित नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्वरीत नोंदणी सूटचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत खरेदी करण्यात येणारी वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असणे आवश्यक असल्याने धोरणात तसा बदल करण्यात आला आहे.

०००००



 


'

Featured post

Lakshvedhi