सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 27 November 2021
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संविधान दिनानिमित्त बार्टी मार्फत संविधान रॅलीचे आयोजन व संविधान बांधिलकी जागर !
संविधानामुळे देशातील करोडो जनतेला न्याय मिळाला : प्रा.हरी नरके
मुंबई, दि. 27 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याकाळातील जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तज्ज्ञ होते. संविधान सभांद्वारे जनतेच्या सूचना स्वीकारण्यात आल्या व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान जनतेला बहाल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांचे अनन्यसाधारण योगदान या देशातील जनतेच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासात आहे. आयुष्यभर त्यांनी शोषित, वंचित व उपेक्षित समाजाला न्याय दिला, असे मत ज्येष्ठ विचारवंत व प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आयोजित बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथील कार्यक्रमात भारतीय संविधान दिनानिमित्त ‘भारताचे संविधान आणि 21 व्या शतकातील भारताची वाटचाल’ या विषयावर प्राध्यापक हरी नरके बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ. राजीव चव्हाण, यशदा प्रकाशन विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाजकल्याण सह आयुक्त प्रशांत चव्हाण मान्यवर उपस्थित होते.
प्रा. हरी नरके म्हणाले की, जगातील लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनामध्ये भारताची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलतत्त्वे आहेत ती इतर राष्ट्रांच्या घटनेमध्ये त्यांचा अभाव दिसतो. भारतीय राज्यघटना लवचीक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले की, संविधानामुळेच राजकारण,अर्थकारण,न्यायव्यवस्था, प्रशासन चालत असते. संविधानाने भारतीयांना न्याय दिला. संविधान हे सुदृढ समाज व्यवस्थेसाठी ऑक्सिजन आहे. आपल्याला पुरोगामी वारसा लाभला असून संविधान जगात सर्वश्रेष्ठ असूनही गेल्या सत्तर वर्षात अनेक समाज बांधव वंचित राहिले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. तसेच राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी व संपूर्ण जनतेला दिशा देण्याचे काम बार्टी संस्था करत असून बार्टीच्या विविध योजना व उपक्रम, संविधान जनजागृतीचे कार्य बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. वंचित घटकांना न्याय देण्याचे काम बार्टी करत आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ.राजीव चव्हाण, डॉ.बबन जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा.महासंचालक यांनी संविधनाची प्रत भेट देऊन केले.
0 0 0
अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -3 चे आयोजन
मुंबई, दि. 27 - महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हीडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.
स्पर्धेचे नियोजन:
जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल
राज्यपातळीवर:- परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.
बक्षिसे:- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.
स्पर्धेचा अभ्यासक्रम
बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100
दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढे
चौथी पाचवी साठी पावकी, निमकी
सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
०००
रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई, दि. 27 : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी आज दिले.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-19 चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी श्री. शिंदे यांनी दिल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असून अनावश्यक गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची गरज आहे. शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी क्लिन अप मार्शल सारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना द्या. सर्व यंत्रणांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांग़ितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही श्री. काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही श्री. काकाणी यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
०००
इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी
विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत
-प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड
मुंबई, दि. 27- राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाईन उपस्थित होते.
प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या 488 आदर्श शाळांत प्रायोगिक तत्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणानं समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करावी, असे निर्देश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले आहेत. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी, असेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
०००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...