सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने
लसीकरण अधिक गतिमान करावे
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. 26 : महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न करून लसीकरण गतिमान करावे, अशी सूचना पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी लसीकरणासह शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, पी.वेलरासू, सुरेश काकाणी, डॉ.संजीव कुमार, सहआयुक्त श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त राजन तळकर, अजय राठोर आदी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतला. त्याबद्दलची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सादर केली. श्री. ठाकरे म्हणाले की, बिगर शासकीय संस्थांमार्फत तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, ज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे मात्र त्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावी, तसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतात, अशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.
पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबतही आढावा घेतला. तसेच खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ते बुजवण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.
00000