Tuesday, 9 June 2026

बिरसा मुंडा यांचे बलिदान स्वाभिमानाची प्रेरणा

 बिरसा मुंडा यांचे बलिदान  स्वाभिमानाची प्रेरणा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा यांच्या यांनी अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात इंग्रजी सत्तेला हादरवून सोडले. त्यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

फडणवीस म्हणाले की, इंग्रजी राजवटीत आदिवासींचे जल, जमीन आणि जंगल यांवरील हक्क हिरावले जात असताना भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे इंग्रजी सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले. त्यांनी केवळ सशस्त्र संघर्षच केला नाही, तर समाजजागृती करून आदिवासी समाजाला संघटित करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आदिवासी वीरांचा इतिहास शोधून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेले आदिवासी नायक पुन्हा प्रकाशझोतात आले.

आदिवासी संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध जीवनपद्धतींपैकी एक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संस्कृतीत निसर्ग संवर्धन, सामाजिक समता आणि लोककेंद्रित शासनव्यवस्थेची मूल्ये आढळतात. त्यामुळे या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे ही शासन, समाज आणि देशाची सामूहिक जबाबदारी आहे.

राज्य शासन हे आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विविध कल्याणकारी योजनांद्वारे सक्षम आदिवासी समाज घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांमागे भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, निर्धार आणि बलिदानाची प्रेरणा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi