महाप्रीतमार्फत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला
मुंबई, दि. ९ जून : वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या सूतगिरण्या, रुग्णालये, शासकीय निवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या इमारतींवर महाप्रीतमार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात पायलट प्रकल्प राबविण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.
या संदर्भातील संयुक्त आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण आणि सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या इमारतींवर महाप्रीतमार्फत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये उपलब्ध जागा, प्रकल्पाची अंमलबजावणी, वीज बचत आणि पर्यावरणीय लाभ यांची माहिती देण्यात आली.
यावेळी मंत्री शिरसाट यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीला सामाजिक न्याय विभागाच्या एका सूतगिरणीसह एका सर्वसाधारण सूतगिरणीवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि आरोग्य विभागाच्या उपलब्ध जागांवरही प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बैठकीत शासकीय संस्थांमधील वीज खर्चात बचत, हरित ऊर्जेला प्रोत्साहन आणि सौरऊर्जेचा व्यापक वापर वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment