आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
• मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय आढावा बैठक
• एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार
• केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत सहभाग
मुंबई, दि. 22 : राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल व सर्व महसूली विभागांचे विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. केवळ कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १५ दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment